२२४ मृत्यू, १४९ रस्ते बंद; १,१२१ कोटींचे नुकसान!

हिमाचलमध्ये मान्सूनचा हाहाकार

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
शिमला,
Monsoon havoc in Himachal हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते, वीज आणि पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. राज्य आपत्कालीन कार्य संचालन केंद्राच्या २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या अहवालानुसार, राज्यातील १४९ रस्ते वाहतुकीसाठी बंद होते. तसेच ६० वीज वितरण ट्रान्सफॉर्मर आणि ३५ पिण्याच्या पाण्याच्या योजना प्रभावित झाल्या आहेत. मंडी जिल्ह्यात सर्वाधिक ८६ रस्ते बंद असून कुल्लूतील ३१ आणि शिमल्यातील १० रस्त्यांचा समावेश आहे.
 
 
dosr
 
३० जून ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीतील अहवालानुसार, मान्सूनमुळे आतापर्यंत २२४ जणांचा मृत्यू झाला असून ३३० जण जखमी झाले आहेत, तर एक व्यक्ती बेपत्ता आहे. यातील ९१ मृत्यू भूस्खलन, पूर, बुडणे, दगड कोसळणे यांसारख्या आपत्तीजन्य घटनांमध्ये झाले असून १३३ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या पावसाळ्यात ४४१ जनावरांचाही मृत्यू झाला आहे. राज्याचे एकूण नुकसान ₹१,१२,१२९.५७ लाख म्हणजेच सुमारे ₹१,१२१.३० कोटी इतके झाले आहे.
 
दरम्यान, २२ ऑगस्टच्या सायंकाळी ९८ असलेली बंद रस्त्यांची संख्या २३ ऑगस्टच्या सकाळपर्यंत १४९ वर पोहोचली. मात्र, याच काळात बाधित वीज ट्रान्सफॉर्मरची संख्या ८९ वरून ६० आणि पाणी योजनांची संख्या ४२ वरून ३५ झाली आहे. हवामान विभागाने शिमला, कांग्रा, मंडी, चंबा, उना, कुल्लू, हमीरपूर, बिलासपूर आणि सिरमौरमध्ये हलका ते मध्यम पाऊस, तर काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. भूस्खलन, ओढे-नद्यांमधील वाढती पाणीपातळी आणि निसरडे रस्ते लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.