मुंबई
hospital canteens सार्वजनिक रुग्णालयांमधील कॅन्टीनच्या परवान्यांचा आणि कंत्राटांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जोगेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महापालिका ट्रॉमा केअर रुग्णालयातील कॅन्टीन परवान्यांच्या प्रश्नामुळे बंद झाल्यानंतर आता घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयातील कॅन्टीनही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना चहा, नाश्ता आणि जेवणासाठी रुग्णालयाबाहेर जावे लागत आहे.
एचबीटी ट्रॉमा केअर रुग्णालयातील कॅन्टीन चालविणाऱ्या केटरर्सने ३ ऑगस्ट रोजी वैद्यकीय अधीक्षकांना पत्र देऊन कॅन्टीन सेवा तत्काळ बंद करण्याची माहिती दिली होती. एफएसएसएआय, आरोग्य आणि अग्निशमन विभागाचे वैध परवाने उपलब्ध नसल्याचे केटरर्सने पत्रात स्पष्ट केले. आवश्यक वैधानिक परवान्यांअभावी कॅन्टीन सुरू ठेवणे कर्मचारी तसेच ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचेही कॅन्टीन चालकाने नमूद केले.
दरम्यान, संबंधित महापालिका विभागाकडून कॅन्टीनची पाहणी करून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे एफडीएकडून संभाव्य कारवाई होण्याच्या पार्श्वभूमीवर कॅन्टीन चालकाने खबरदारी म्हणून सेवा बंद केल्याची चर्चा आहे. महापालिकेकडून या कॅन्टीनची तपासणी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, ट्रॉमा केअर रुग्णालयातील कॅन्टीनकडून मे महिन्यात आवश्यक अनुपालन करण्यात आले असून सध्या कोणतीही बाब प्रलंबित नसल्याचे एका एफडीए अधिकाऱ्याने सांगितले.
दुसरीकडे, घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयातील कॅन्टीनही बंद पडले आहे. संबंधित कॅन्टीन चालकाचा करार संपल्याने सेवा थांबविण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नवीन निविदा काढून कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत कॅन्टीन बंद राहणार आहे.
दोन्ही महापालिका रुग्णालयांतील कॅन्टीन बंद असल्याने उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः रुग्णालयात दीर्घकाळ थांबणाऱ्या नातेवाईकांना जेवण आणि नाश्त्यासाठी बाहेर जावे लागत असल्याने अतिरिक्त खर्च आणि त्रास सहन करावा लागत आहे.
या दोन्ही घटनांमुळे महापालिका रुग्णालयांमधील कॅन्टीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कॅन्टीनसाठी आवश्यक अन्नसुरक्षा परवाने, इतर वैधानिक मंजुरी तसेच कंत्राटांची नियमित तपासणी केली जाते का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.