बंगालच्या उपसागरात एमव्ही ओशन विनर बेपत्ता...नौदलाच्या ३ युद्धनौका रवाना

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
भुवनेश्वर,
MV Ocean Winner goes missing in Bay of Bengal ओडिशातील पारादीप बंदरातून चीनच्या दिशेने निघालेले एमव्ही ओशन विनर हे मालवाहू जहाज बंगालच्या उपसागरात बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. जहाजावर एकूण २४ परदेशी कर्मचारी होते. त्यापैकी दोन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून उर्वरित २२ कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे.भारतीय नौदलाने बेपत्ता जहाजाचा माग काढण्यासाठी आयएनएस वरद, आयएनएस अनमोल आणि आयएनएस विजयित या तीन युद्धनौका समुद्रात रवाना केल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय तटरक्षक दलाचे पारादीप येथील पथकही शोधकार्यात सहभागी झाले आहे. समुद्रातील विस्तीर्ण परिसरात विविध यंत्रणांकडून बचाव आणि शोधकार्य सुरू आहे.
 
 
 
bay
 
मिळालेल्या माहितीनुसार, २० ऑगस्टच्या रात्री एमव्ही ओशन विनर पारादीप बंदरातून चीनसाठी रवाना झाले होते. या जहाजावर सुमारे ७२ हजार मेट्रिक टन लोहखनिज होते. म्यानमारमार्गे चीनच्या दिशेने जात असताना जहाजाशी संपर्क तुटला. पारादीपपासून सुमारे २२० सागरी मैलांवर, पोर्ट ब्लेअर परिसराच्या जवळील सागरी क्षेत्रात जहाज बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे.जहाजावरील २४ कर्मचाऱ्यांमध्ये २० चिनी नागरिक, तीन म्यानमारचे नागरिक आणि एका बांगलादेशी नागरिकाचा समावेश होता. दोन कर्मचाऱ्यांची सुटका झाल्यानंतर उर्वरित २२ जणांचा शोध घेण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाने मोहीम अधिक तीव्र केली आहे. बचावलेल्या दोघांवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची पदे आणि ओळख निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
 
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सरबानंद सोनोवाल यांनीही या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरून दिलेल्या माहितीनुसार, पनामाचा ध्वज असलेले एमव्ही ओशन विनर हे जहाज पारादीप बंदरातून लोहखनिज घेऊन चीनकडे रवाना झाले होते. जहाज बेपत्ता झाल्यानंतर सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने शोध आणि बचावकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, समुद्रातील परिस्थिती आणि जहाजाच्या नेमक्या ठिकाणाबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. बचावलेल्या दोन कर्मचाऱ्यांकडून मिळणारी माहिती आणि सुरू असलेल्या शोधमोहिमेच्या आधारे उर्वरित २२ कर्मचाऱ्यांचा ठावठिकाणा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.