वाटेतच काळाचा घाला ट्रकवर कार आदळून तिघांचा मृत्यू

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
नागपूर
car accident सिहोर येथील कुबेरश्वर धामच्या दर्शनासाठी निघालेल्या नागपूरमधील भाविकांच्या कारला मुलताईजवळ भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकच्या मागील भागावर भरधाव कार आदळल्याने या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटे बैतूल-नागपूर महामार्गावर ही दुर्घटना घडली.
 

car accident 
या अपघातातील मृतांमध्ये बुटीबोरी येथील दीपक श्यामराव राऊत (५५), त्यांच्या पत्नी छाया दीपक राऊत (५१) आणि प्रभा रामकृष्ण करदाते (४८) यांचा समावेश आहे. तर नीता (४०), नैतिक (१२), उज्ज्वला मोहन (५२), संगीता (४३) आणि सौरभ (३०) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक राऊत यांच्यासह कुटुंबीय आणि शेजारी एमएच-४९-सी-४७५६ क्रमांकाच्या कारने सिहोर येथील कुबेरश्वर धामच्या दर्शनासाठी निघाले होते. मुलताईजवळ आल्यानंतर कार चालकाला डुलकी लागल्याने रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक त्याच्या लक्षात आला नसावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.कारने थेट ट्रकच्या मागील भागाला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. कारचे पुढील चाक तुटून वेगळे झाले, तर छताचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर मुलताई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी नागपुरात हलवण्यात आले. दर्शनासाठी आनंदाने निघालेल्या कुटुंबावर वाटेतच काळाने घाला घातल्याने राऊत आणि करदाते कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, बालेवाडी-महाळुंगे परिसरातही रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ग्रीन कोट सोसायटीसमोरील दुर्गा कॅफेजवळ रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरली. त्यावेळी ट्यूशनला जात असताना वडील, मुलगा आणि मुलगी एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते. दुचाकी घसरल्यानंतर ११ वर्षीय ऋषभ पाटोळे हा मागून येणाऱ्या आयशर ट्रकखाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडलेला हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सलग घडलेल्या या दुर्घटनांमुळे रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकीकडे महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे होणारे अपघात, तर दुसरीकडे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या दुर्घटना, यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.