जपतलाई आश्रमशाळेच्या तपासणीत हलगर्जीपणा; दोन अधिकारी निलंबित

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
गडचिरोली,
japtalai ashram school धानोरा तालुक्यातील जपतलाई अनुदानित आश्रमशाळेच्या तपासणीत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी आदिवासी विकास विभागाने दोन अधिकार्‍यांना निलंबित केले आहे. तत्कालीन प्रभारी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. कन्नाके आणि सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) पी.पी. सादमवार यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
 
 
japtalai ashram school
 
शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद न साधणे, शौचालये व स्नानगृहांची अस्वच्छता, प्राथमिक उपचार पेटीचा अभाव, मुलींच्या वसतिगृहातील सुरक्षेच्या त्रुटी, शुद्धीकरणाविना पिण्याचे पाणी, फाटलेल्या गाद्या आणि भोजनाच्या तक्रारी यांसारख्या गंभीर बाबी तपासणी अहवालात योग्यरीत्या नोंदविल्या नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. दोन्ही अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यांचे खुलासे अमान्य ठरवत महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांनुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली. जपतलाई प्रकरणानंतर आश्रमशाळांच्या नियमित तपासणीची परिणामकारकता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
 
जपतलाई प्रकरण : कारवाईत दुजाभाव, जबाबदारांवर कारवाई कधी?
जपतलाई प्रकरणात आदिवासी प्रकल्प कार्यालयाने दोन अधिकार्‍यांचे निलंबन केले असले, तरी ही कारवाई केवळ पाठराखण करणारी असल्याची चर्चा आहे. संबंधित अधिकार्‍यांवर अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. दुसरीकडे, पोलिसांनी मुख्याध्यापक आणि पुरुष अधीक्षक यांनाच अटक करून कारवाई केली. त्यानंतर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र संस्थाचालक, सचिव आणि महिला अधीक्षिकेवर अद्याप अटकेची कारवाई झालेली नाही. या दुजाभावामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, चोर सोडून संन्याशाला फाशी अशी संतप्त प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे. सर्व संबंधित जबाबदार व्यक्तींवर समान निकषाने कारवाई करून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.