मस्कत, दुबईमार्गे भारतात आल्या पाकिस्तानी वधू!

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Pakistani bride arrives in India ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तानदरम्यानची वाघा-अटारी सीमा बंद झाल्याने अनेक आंतरराष्ट्रीय विवाह अडचणीत आले. मात्र, विवाहाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुमारे १५० पाकिस्तानी वधूंनी पर्यायी मार्गाचा अवलंब करत भारत गाठला. मस्कत, कोलंबो, ढाका, दुबई आणि कतारमार्गे कनेक्टिंग विमानांनी या वधू नागपूर, जोधपूर, अहमदाबाद, रायपूर, पुणे आणि भोपाळ येथे पोहोचल्या. गृह मंत्रालयाने दिलेल्या विशेष सवलतीमुळे त्यांचा भारतातील प्रवास शक्य झाला.
 
 
 

Pakistani bride arrives in India
 
एप्रिल ते जूनदरम्यान सुमारे ४५० पाकिस्तानी वधू आपल्या नातेवाईकांसह भारतात आल्याची माहिती आहे. मात्र, व्हिसाच्या निर्बंधांमुळे वधूंसोबत आलेल्या नातेवाईकांना ठरावीक कालावधीत पाकिस्तानात परतावे लागले. सिंधमधील खानपूर तहसीलची आरती हिचेही भारतात लग्न झाले. तिचा साखरपुडा आधीच झाला होता; मात्र अटारी सीमा बंद झाल्याने तिचा भारतातील प्रवास लांबला. अखेर एका वर्षापेक्षा अधिक काळानंतर ती मस्कतमार्गे नागपूरला पोहोचली आणि मार्चमध्ये इंकेश जशनानी यांच्यासोबत विवाहबद्ध झाली. व्हिसाच्या नियमांमुळे तिच्यासोबत केवळ तिचा भाऊ भारतात येऊ शकला.
 
दरम्यान, पाकिस्तानातून भारतात आलेल्या वरांचाही यामध्ये समावेश आहे. सिंधमधील घोटकी येथील राभेल जसवानी हा आपल्या आई-वडिलांसह नागपूरला आला आणि श्रियाशी विवाह केला. सध्या तो भारतातच राहत आहे. सीमा पुन्हा खुल्या झाल्यानंतर भारतात स्थायिक होण्याची आणि आपल्या आई-वडिलांनाही येथे आणण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. त्यामुळे भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या काळातही विवाहबंधनासाठी दोन्ही देशांतील नागरिकांनी पर्यायी मार्ग शोधल्याचे चित्र दिसत आहे.