लोहखनिज घेऊन जाणारे जहाज बुडाले; २४ जणांचा जीव धोक्यात

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
पारादीप
paradip ship sinking ओडिशातील पारादीप किनाऱ्यापासून सुमारे २४० नॉटिकल मैल अंतरावर बंगालच्या उपसागरात पनामा ध्वजधारी मालवाहू जहाज बुडाले. ‘एमव्ही ओशन विनर’ या जहाजावर २४ जणांचा कर्मचारीवर्ग होता. ओडिशातून ७२,१०० मेट्रिक टन आयर्न ओर फाइन्स म्हणजेच लोहखनिजाची बारीक पावडर घेऊन हे जहाज सिंगापूरच्या दिशेने निघाले होते. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून, आतापर्यंत दोन जणांना समुद्रातून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.
 

paradip ship sinking 72,100 tonnes iron ore cargo, 24 crew members in danger 
एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जहाजावरील बहुतांश कर्मचारी चिनी नागरिक आहेत. एकूण २४ कर्मचाऱ्यांमध्ये २० चीनचे, तीन म्यानमारचे आणि एका बांगलादेशी नागरिकाचा समावेश आहे. हे जहाज ओडिशातून ७२,१०० मेट्रिक टन आयर्न ओर फाइन्स घेऊन सिंगापूरला जात होते.
अधिकाऱ्याने सांगितले की, ‘एमव्ही ओशन विनर’ हे जहाज २० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजून ४२ मिनिटांनी पारादीप किनाऱ्यावरून रवाना झाले होते. जहाज बुडाल्याची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने बचाव मोहीम हाती घेतली. मदतकार्यासाठी परिसरातून जाणाऱ्या इतर जहाजांनाही सतर्क करण्यात आले आहे. “इंडियन कोस्ट गार्ड आणि इंडियन नेव्हीने बचाव अभियान सुरू केले आहे. आतापर्यंत पाण्यातून दोन जणांना वाचवण्यात आले आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, कार्गो जहाजाशी संबंधित आणखी एका गंभीर घटनेची माहिती याच आठवड्यात समोर आली आहे. सोमालियाच्या पुंटलँड किनाऱ्याजवळ कॅमेरूनच्या ध्वजाखालील एका मालवाहू जहाजाचे समुद्री चाच्यांनी अपहरण केले असून, त्यावरील १० सदस्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये सहा भारतीय नागरिकांचा समावेश आहे. सोमालियाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलर मूव्हमेंट शिपिंगच्या मालकीचे ‘एम/व्ही LUTUF’ हे जहाज सोमवारी पुंटलँडमधील इयल जिल्ह्यातील मर्राया परिसरापासून सुमारे ३.५ नॉटिकल मैल अंतरावर ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर हे जहाज नुगाल किनाऱ्याच्या दिशेने नेण्यात आले.
या जहाजावर तुर्कीतील शस्त्रे, दळणवळणाची साधने आणि उपग्रह उपकरणे होती. ही सामग्री मोगादिशूमधील तुर्कीच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रात नेली जात असल्याचे सांगण्यात आले. ‘एपी’च्या वृत्तानुसार, जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये सहा भारतीय, एक तुर्की नागरिक, एक जॉर्जियन नागरिक आणि दोन सर्बियन सुरक्षा रक्षकांचा समावेश होता.मिळालेल्या माहितीनुसार, ‘एम/व्ही LUTUF’चे अपहरण करणारे आठ समुद्री चाचे २६ एप्रिल रोजी ‘एम/व्ही Sward’च्या अपहरणात सहभागी असलेल्या गटाशी संबंधित आहेत. या चाच्यांनी जहाज पुंटलँडमधील डंगोरोयो जिल्ह्यातील गरमालजवळील किनाऱ्याच्या दिशेने नेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तुर्कीची दोन जहाजे अपहृत जहाजाजवळ पोहोचली, तर तुर्कीच्या हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या माध्यमातून परिसरावर नजर ठेवण्यात आली.