सोयाबीन, कपाशीवर किडींचा प्रादुर्भाव

शेतकर्‍यांच्या अडचणीत भर, ढगाळ वातावरणाचा पिकांवर परिणाम

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
वर्धा
pest-infestation यंदाचा शेती हंगाम शेतकर्‍यांसाठी चांगलाच जिव्हारी लागला आहे. सुरूवातीला पेरण्या आटोपल्या. बोगस बियाण्यांमुळे अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. त्यातच पावसाने सर्वच नक्षत्रात दगा दिला. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शयता वर्तवित असताना आता सोयाबीन, कपाशीवर किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत भर पडली आहे.
 
crop
 
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १.१९ लाख हेटरवर सोयाबीन तर २.३१ लाख हेटरवर कपाशीची लागवड केली आहे. मात्र, पीक वाढीच्या अवस्थेत असलेल्या या दोन्ही पिकांवर सध्या कीड रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. जिल्ह्यात जून ते आतापर्यंत ४४६.४ मिमी पाऊस झाला आहे. यंदा सुरूवातीला पाऊस लांबणीवर गेल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. नंतर पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी पेरणीच्या कामाला गती दिली. खरीप हंगामात जिल्ह्यात ४.१८ लाख हेटरवर शेतकर्‍यांनी विविध पिकांची लागवड केली आहे. पावसाचा खंड जिल्ह्यात कायम असल्याने अंकूरलेले आणि वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना जगविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तब्बल २० दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे, मात्र पावसाचा पत्ताच नव्हता. त्यामुळे कसेबसे पीक तग धरून होते. येत्या तीन-चार दिवसात पाऊस न आल्यास पिकं करपण्याच्या मार्गावर होती. अशातच शनिवारपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यामुळे अनेक परिसरात पिकांना नवसंजीवनीच मिळाली. मात्र, काही तालुयांमध्ये ढगाळ वातावरणाचा फटका बसला असून अनेक शेतातील पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे.

सोयाबीनवर अळी तर कपाशीवर मावा, तुडतुडे
जिल्ह्यात यंदा १ लाख १९ हजार ६२६.७० हेटरवर सोयाबीनची पेरणी झाली. बहुतांश भागातील सोयाबीन १ ते १.५ फुट उंचीचे झाले असून सोयाबीन पीक फुलोरा व वाढीच्या अवस्थेत आहे. या पिकावर सध्या चक्रीभूगा, खोडमाशी, तंबाखुची पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तर वाढीच्या अवस्थेत असलेले कपाशी पीक १.५ ते २ फुट उंचीचे झाले आहे. काही ठिकाणी हे पीक पाती, फुले धारणा अवस्थेत आहे. पण यावर काही ठिकाणी अल्प प्रमाणात मावा, तुडतुडे, पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने कापूस उत्पादकांच्या अडचणीतही भर पडली आहे.
 
...प्रतिक्रिया...
जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर चक्रीभूगा, खोडमाशी, तंबाखुची पाने खाणारी अळी तर कपाशीवर मावा, तुडतुडे, पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी कृषी विभागाच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन कीड रोगाचे व्यवस्थापन करावे, अशी प्रतिक्रीया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर यांनी दिली.