मुंबई
poonam dhillon नितळ हसू, बोलके डोळे आणि सौंदर्यामुळे एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष गाजलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लो यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्या वेगाने बऱ्या होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना लवकर बरे वाटावे यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
पूनम धिल्लो रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीविषयी विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान, त्यांची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाचे अपडेट दिले आहे. “पूनम यांची प्रकृती आता स्थिर असून त्या वेगाने रिकव्हर होत आहेत. प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांना संध्याकाळपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. सध्या डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत,” असे पद्मिनी कोल्हापुरी यांनी नमूद केले.
दरम्यान, गेल्या काही काळापासून पूनम धिल्लो या सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात CINTAAमधील नेतृत्वाच्या वादामुळेही चर्चेत आहेत. CINTAAच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सध्या त्यांच्याकडे आहे. मात्र, CINTAAच्या जनरल सेक्रेटरी आणि अभिनेत्री उपासना सिंह यांनी पूनम धिल्लो तसेच उपाध्यक्ष पद्मिनी कोल्हापुरी यांच्यावर मनमानी कारभार केल्याचा आरोप केला होता. या वादानंतर समितीतील 11 सदस्यांनी राजीनामे दिल्याचे समोर आले होते. त्यामध्ये विंदू दारा सिंह, पुनीत इस्सर, मुकेश ऋषि, हेमंत पांडे, साहिल चड्ढा आणि दीपक पराशर यांचा समावेश आहे. या संपूर्ण वादावर पूनम धिल्लो यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.पूनम धिल्लो यांनी 1970च्या दशकाच्या उत्तरार्धात अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘त्रिशूल’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन, संजीव कुमार आणि शशी कपूर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले. त्यानंतर ‘काला पत्थर’, ‘नूरी’, ‘दर्द’, ‘तेरी कसम’, ‘यादगार’, ‘लेला’, ‘कयामत’, ‘गिरफ्तार’, ‘तेरी महरबानियां’, ‘कर्मा’ आणि ‘मालामाल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.सध्या पूनम धिल्लो यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पद्मिनी कोल्हापुरी यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांना संध्याकाळपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.