जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन, शेतकरी सुखावला

धान, कापूस, सोयाबीन, तूर पिकांना नवसंजीवनी

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
चंद्रपूर
rain-returns जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणानंतर शनिवारी रात्रीपासून ते रविवारी दूपारपर्यंत अनेक भागात दमदार व जोरदार सरी बरसल्या आहेत. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, धान, कापूस, सोयाबीन, तूर पिकांना नवसंवनी मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे. मागच्या 24 तासात जिल्ह्यात 112 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

rain return 
 
 
शेतकर्‍यांनी यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात धानासह कापूस, सोयाबीन व तुरीची लागवड केली आहे. मात्र, काही दिवस पावसाने दडी मारल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. विशेषतः धान पिकाला पाण्याची गरज असताना पावसाचा खंड पडल्याने शेतकरी चिंतेत होते. दरम्यान, जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शेतशिवारात पाणी साचले असून, जमिनीतील ओलावा वाढला आहे. त्यामुळे धान पिकासह कापूस, सोयाबीन व तूर पिकांना मोठा फायदा होणार आहे. पावसामुळे पिकांची वाढ जोमाने होण्यास मदत मिळणार असल्याने खरीप हंगामातील उत्पादनाबाबत शेतकर्‍यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
 
नागभीड तालुक्यात बर्‍याच शेतकर्‍यांचे धानाची रोवणी बाकी होते. तर काहीचे रोवणे होऊन धान करपायला सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र, 22 ऑगस्टपासून पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या व 23 ऑगस्ट रोजी दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाची अशीच साथ मिळाल्यास यंदाचा खरीप हंगाम समाधानकारक होण्याची आशा शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील धरणात 55.85 टक्के जलसाठा
चंद्रपूर जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु असा एकूण 98 प्रकल्पात एकूण 55.85 टक्के (177.822 दलघमी) जलसाठा झाला आहे. तर चंद्रपूरला पाणीपुरवठा करणार्‍या महाजेनकोच्या इरई प्रकल्प 74.50 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मोठे व मध्यम 10 प्रकल्पामध्ये पकड्डीगुड्डम धरणात 96.49, डोंगरगाव 89.46, लभानसराड 75.35, चारगाव 71.14, अमलनाला 69.42 नलेश्‍वर 51.39, लालनाला प्रकल्प 48.91, चंदई 47.98, असोलामेंढा 43.74, तर घोडाझरी धरणात 33.95 टक्के जलसाठा आहे.