रोशेश ते शेतकरी! 2 कोटींच्या कर्जात बुडाला अभिनेता

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
मुंबई
rajesh kumar ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या लोकप्रिय कॉमेडी मालिकेतील रोशेशच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता राजेश कुमार याने अभिनयापासून काही काळ दूर जात शेती करण्याचा निर्णय घेतला होता. 2017 मध्ये मुंबई सोडून तो बिहारमधील आपल्या गावाकडे परतला. केवळ पैसे कमावणे हा त्याचा उद्देश नव्हता, तर शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष अनुभवून त्या समजून घेण्याची त्याची इच्छा होती. मात्र, शेतीचा हा प्रवास त्याच्यासाठी अत्यंत खडतर ठरला आणि सततच्या नुकसानीमुळे त्याच्यावर तब्बल 2 कोटी रुपयांचे कर्ज झाले.
 

rajesh kumar farming journey: sarabhai vs sarabhai actor faced rs 2 crore debt, now only rs 20 lakh left 
राजेश कुमारच्या या निर्णयावर सद्गुरूंच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. ‘रॅली फॉर रिव्हर्स’सह विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असताना तरुणांनी शेतीकडे वळावे, असा संदेश त्याने ऐकला. त्यानंतर केवळ शेतकऱ्यांना सल्ला देण्यापेक्षा स्वतः शेती करून त्यांची परिस्थिती समजून घेण्याचा निर्णय त्याने घेतला. त्याने हॉर्टिकल्चर अर्थात बागायतीपासून शेतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
मात्र, सुरुवातीला चांगली वाढणारी झाडे पुढे त्याच्यासाठी मोठ्या संकटाचे कारण ठरली. तब्बल 35 वर्षांनंतर परिसरात आलेल्या भीषण पुरामुळे त्याची संपूर्ण मेहनत वाहून गेली. त्यानंतर राजेशने पुन्हा सुमारे 15 हजार झाडे लावली; मात्र कोरोना महामारीमुळे त्याचे नियोजन विस्कळीत झाले. त्यातच पाण्याच्या समस्येनेही मोठा धक्का दिला. जवळपास 500 फूट बोअरवेल खोदूनही त्याला पाण्याचा थेंब मिळाला नाही.
सततच्या नुकसानीमुळे राजेश कुमारची  rajesh kumar आर्थिक परिस्थिती बिकट झाली. त्याने आपली संपूर्ण बचत शेतीत गुंतवली आणि अखेर त्याच्यावर सुमारे 2 कोटी रुपयांचे कर्ज झाले. परिस्थिती इतकी कठीण झाली होती की, मुलाच्या शाळेबाहेर भाजी विकूनही त्याला उदरनिर्वाह करावा लागला.तरीही राजेशने या संपूर्ण काळाकडे अपयश म्हणून पाहिले नाही. आध्यात्मिकतेमुळे कठीण परिस्थितीतही तणाव आणि नैराश्यापासून दूर राहता आल्याचे त्याने सांगितले. सातत्याने प्रयत्न करत राहिल्यानंतर त्याची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. एप्रिलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 2 कोटी रुपयांच्या कर्जापैकी आता केवळ 10 ते 15 टक्के कर्ज बाकी असल्याचे त्याने सांगितले होते. म्हणजेच अंदाजे 20 लाख रुपये कर्ज अद्याप फेडायचे आहे.
शेतीच्या या कठीण प्रवासादरम्यान राजेश कुमारने अभिनय क्षेत्रातही पुन्हा प्रवेश केला. ‘साराभाई वर्सेस साराभाई’मधील रोशेश ही त्याची लोकप्रिय ओळख आजही कायम आहे. ‘सैयारा’, ‘है जवानी तो इश्क होना है’, ‘ओह माय डॉग’ आणि ‘निशानची’ यांसारख्या प्रोजेक्ट्समध्येही तो दिसला आहे. त्यामुळे एकीकडे शेतीतील मोठ्या आर्थिक संकटातून सावरण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे अभिनयाच्या क्षेत्रात पुनरागमन, असा राजेश कुमारचा प्रवास सध्या चर्चेत आहे.