यवतमाळात किलोचा भाव 75 ते 78 रुपयांवर
यवतमाळ,
rising sugar prices कालपर्यंत चहाच्या कपात सहज विरघळणारी साखर आता ग्राहकांच्या खिशाला चांगलीच चटके देऊ लागली आहे. अवघ्या काही दिवसांत साखरेच्या दराने मोठी झेप घेतल्याने ‘साखर गोड, पण भाव कडू’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील काही बाजारपेठांमध्ये साखरेचा किरकोळ दर 70 ते 80 रुपयांपर्यंत पोहोचला असून यवतमाळातही साखरेचा दर 75 ते 78 रुपये किलोपर्यंत गेला आहे.
एकीकडे सणासुदीचे दिवस जवळ येत असताना मिठाई, लाडू, चहा आणि घरगुती पदार्थांसाठी साखरेची मागणी वाढत आहे. दुसरीकडे उत्पादनातील घट, उपलब्ध साठा, बाजारातील पुरवठा आणि इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा वापर यांसारख्या कारणांमुळे साखरेच्या दरावर दबाव वाढला आहे. गेल्या काही दिवसांतच दरवाढीचा वेग इतका वाढला की ग्राहक अक्षरशः ‘साखर घ्यायची की चहाचा गोडवा कमी करायचा’ या संभ्रमात पडले आहेत. ‘नको नको साखर नको, मला कमी साखर चालेल’ अशी म्हणण्याची वेळ आता चहाप्रेमींवर आली आहे. घरगुती बजेटमध्ये फार मोठा वाटा नसला तरी रोजच्या वापरातील साखरेचा दर एवढा वाढल्याने त्याचा परिणाम महिन्याच्या किराणा खर्चावर जाणवू लागला आहे.
दरवाढीचा फटका मिठाई व्यवसायींनाही बसत आहे. साखर महागल्याने पेढे, बर्फी, लाडू, जिलेबी यांसारख्या मिठाईंच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे आगामी सणांमध्ये मिठाईच्या दरातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वाढत्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने साखरेच्या साठ्यावर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला असून, कच्च्या साखर आयातीचीही परवानगी देण्यात आली आहे.rising sugar prices त्यामुळे आगामी काळात साखरेच्या दरांना काहीसा लगाम बसतो का, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. साखर चाळीशीत असताना गोड होती, पण सत्तरीत पोहोचताच तिचा गोडवा कमी आणि भाव कडू झाल्याची भावना मात्र सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.