मुंबई
rohullah mehdi मनोरंजन विश्वातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. ड्रग्ज प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून मॉडेल आणि अभिनेता रोहुल्लाह मेहदी याला अटक करण्यात आली आहे. काशिमिरा पोलिसांनी मुंबई विमानतळावर ही कारवाई केली. मेहदी दिल्लीहून मुंबईला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर विमानतळावर सापळा रचण्यात आला आणि तो विमानतळावर उतरताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
रोहुल्लाह मेहदी हा मॉडेल आणि अभिनेता असून सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्याचा ड्रग्ज नेटवर्कशी संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच या प्रकरणात तो फरार असल्याचेही समोर आले होते. त्याच्या हालचालींबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीसह तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी कारवाईची तयारी केली. दिल्लीहून मुंबईला येताच त्याला विमानतळावर अटक करण्यात आल्याचे वृत्त एबीपीने दिले आहे.
मेहदीचा ड्रग्ज नेटवर्कशी नेमका काय संबंध आहे, तसेच या प्रकरणात त्याची भूमिका काय आहे, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. त्याची कसून चौकशी केली जात असून या चौकशीतून ड्रग्ज पुरवठादार, नेटवर्कमधील इतर आरोपी आणि या हाय-प्रोफाइल प्रकरणातील आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नवी मुंबई पोलिसांनीही गेल्या तीन महिन्यांत पाच मोठ्या कारवाया केल्या आहेत. या कारवायांमध्ये अनेक आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या कॅन्टीन आणि अड्ड्यांवर छापे टाकून कोकेन आणि एमडीचा साठा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. आफ्रिकन नागरिक मुंबई आणि नवी मुंबईत व्यापार, वैद्यकीय उपचार किंवा शिक्षणासाठी येतात. मात्र, त्यापैकी काही जण नंतर अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांत 1500 हून अधिक आफ्रिकन नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले आहे.
अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील कारवायांमुळे नवी मुंबई पोलिसांसमोर आता आणखी मोठे आव्हान उभे राहिले आहे. जेएनपीए आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येणाऱ्या प्रवाशांसह कार्गो सुविधांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित करण्याची तयारी सुरू केली आहे. जेएनपीए हे मोठे बंदर असल्याने तेथे सातत्याने देखरेख ठेवली जाते. आगामी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एअर कार्गो सुविधांवरही लक्ष ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज असल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अमली पदार्थविरोधी मोहिमेबाबत बोलताना दिली.
रोहुल्लाह मेहदीला विमानतळावरून झालेली अटक आणि त्यानंतर सुरू असलेली चौकशी यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. पोलिसांच्या तपासातून या कथित ड्रग्ज नेटवर्कमागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.