नवी दिल्ली,
Saraansh Jain in Team India भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना कोलंबोच्या सिंहलीज क्रिकेट स्टेडियमवर सुरू झाला आहे. पहिल्या कसोटीत भारताने श्रीलंकेचा १६५ धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिका खिशात घालण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत ३३ वर्षीय अष्टपैलू सारांश जैनला पदार्पणाची संधी दिली. विशेष म्हणजे, अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने सारांशला टीम इंडियाची पदार्पणाची कॅप प्रदान केली.मध्य प्रदेशचा सारांश जैन हा डावखुरा फलंदाज असून उजव्या हाताने ऑफ-स्पिन गोलंदाजी करतो. एप्रिल २०१४ मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तब्बल १२ वर्षे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने कामगिरी करत अखेर त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले. ५४ प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने १८८ विकेट्स घेतल्या असून गोलंदाजीची सरासरी २७.३० आहे. फलंदाजीत त्याच्या नावावर २,२२३ धावा असून ३१.७५ च्या सरासरीने त्याने दोन शतके आणि १४ अर्धशतके झळकावली आहेत.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही सारांशने आपली अष्टपैलू क्षमता दाखवली आहे. ४७ लिस्ट-ए सामन्यांत त्याने ५५३ धावा आणि ३८ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये २० सामन्यांत त्याच्या नावावर १८ विकेट्स आणि ३७ धावा आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करण्यासोबतच त्याने इंडिया ए, दुलीप ट्रॉफीतील सेंट्रल झोन आणि इराणी ट्रॉफीतील रेस्ट ऑफ इंडिया संघाकडूनही खेळले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तब्बल १२ वर्षांनी सारांशला टीम इंडियाची कॅप मिळाली आहे. युवा वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या तुलनेत त्याचा प्रवास प्रदीर्घ राहिला. मात्र देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्याच्या जोरावर त्याने अखेर ३३व्या वर्षी भारतीय कसोटी संघात स्थान मिळवले. आता कोलंबो कसोटीत आपल्या फिरकी गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही तो भारतासाठी किती उपयुक्त ठरतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.