कोलंबो,
Second century of Padikkal in Colombo श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी देवदत्त पडिक्कलने शानदार शतक झळकावत आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदवला. १६८ चेंडूंमध्ये शतक पूर्ण करणाऱ्या पडिक्कलचे हे कसोटी क्रिकेटमधील दुसरे शतक ठरले. यापूर्वी गॉल येथे झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने १६७ धावांची दमदार खेळी केली होती.पडिक्कलच्या या कामगिरीमुळे जवळपास सात वर्षांनंतर भारताच्या तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाने सलग दोन कसोटींमध्ये शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. त्याच्याआधी चेतेश्वर पुजाराने २०१८-१९च्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत ही कामगिरी केली होती. पुजाराने मेलबर्न कसोटीत १०६, तर सिडनी कसोटीत १९३ धावांची खेळी केली होती. परदेशात सलग दोन कसोटींमध्ये शतके झळकावणारा पडिक्कल हा पुजारानंतरचा भारतीय फलंदाज ठरला आहे.
केएल राहुल १८ धावांवर बाद झाल्यानंतर पडिक्कल फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याने सुरुवातीपासूनच आत्मविश्वासाने फलंदाजी करत यशस्वी जैस्वालसोबत दुसऱ्या विकेटसाठी २९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी १२० धावांची शतकी भागीदारी रचली. गिल ५० धावांवर बाद झाला. विशेष म्हणजे पडिक्कलला शून्य आणि एक धाव अशा दोन वेगवेगळ्या टप्प्यांवर जीवदान मिळाले, ज्याचा त्याने पुरेपूर फायदा उठवत शतक साकारले. दरम्यान, नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली; मात्र सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. केएल राहुलनंतर यशस्वी जैस्वालही ४५ धावांवर आसिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आला असून, संसर्गामुळे कुलदीप यादवच्या जागी सारांश जैनला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.