सेलू
selu potholes शहरात विकासाचे तीनतेरा वाजत असताना कोट्यवधी रुपये खर्च करून दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या बस स्थानक परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या बसस्थानकच्या सौंदर्यीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, या बस स्थानकात प्रवेशद्वारावरच मोठे खड्डे पडले असून या खड्ड्याला जवळपास एक वर्षाचा कालावधी होत आला असताना प्रशासनाच्या नजरेत खड्डे पडलेच नाहीत. बस स्थानकावर प्रवाश्यांना असुविधेचा सामना करावा लागत आहे.
या बस स्थानकाला लागलेली गळती थांबविण्याचे काम करण्यात आले. मात्र, त्याच परिसरात दर्शनी भागावर असणारे खड्डे का बुजविण्यात आले नाही, हा संशोधनाचा विषय आहे.
बसस्थानकाला नवीन ‘लुक’ देण्यात आला खरा पण येथे जलद बसेस येणे बंद झाल्या. एक वर्षातच बस स्थानकाला गळती लागली. आता तर चक बसस्थानकावरच खड्डे पडत आहे. या खड्ड्यांमुळे प्रवाश्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरातील खड्ड्यांची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.
सत्ताधार्यांवरच निवेदन देण्याची वेळ
येथील समस्या निवेदन दिल्याशिवाय सुटल्या नाहीत. त्यात बस स्थानकाला गळती असो, की जलद बसेस बस स्थानकावर येत नसेल व विद्यार्थ्यांच्या पासेसचा प्रश्न असो, यासाठी निवेदन द्यावेच लागले. जलद बसेसच्या बाबतीत तर सत्तारूढ पक्षाच्या संघटनेलाच पुढाकार घ्यावा लागला. मग या खड्ड्यांच्या बाबतीतही प्रशासन निवेदनाची प्रतीक्षा तर करीत नाही ना, अशी चर्चा होत आहे.