कोलंबो कसोटीत भारताला धक्का; पंत दुखापतग्रस्त

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
कोलंबो,
pant injured भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर सुरू आहे. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार शुभमन गिलने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताला मोठा धक्का बसला. यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत मनगटाच्या दुखापतीमुळे निवृत्त होऊन मैदानाबाहेर गेला.

pant injured
भारतीय डावातील ५८व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारने शॉर्ट चेंडू टाकला. त्यावर मोठा पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना पंतचा फटका चुकला आणि चेंडू त्याच्या मनगटाजवळ जाऊन आदळला. दुखापतीनंतर पंतला तीव्र वेदना जाणवत होत्या आणि मनगटाला सूजही आली. भारतीय संघाच्या फिजिओने तातडीने त्याच्यावर उपचार केले. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर पंतच्या मनगटाला टेप लावण्यात आली. मैदानातील पंचांशी चर्चा केल्यानंतर त्याने दुखापतीमुळे मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. पंतने आपल्या डावात १५ चेंडूंचा सामना करत ३ धावा केल्या.
दरम्यान, भारताची सुरुवातही अपेक्षेप्रमाणे झाली नाही. सलामीवीर केएल राहुल १८ धावांवर, तर यशस्वी जैस्वाल ४५ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी १२० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. गिलने अर्धशतक पूर्ण करत भारताच्या डावाला मजबूत आधार दिला, मात्र त्यानंतर तो बाद झाला. या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. कुलदीप यादव आजारी असल्याने त्याच्या जागी सारांश जैनला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे. त्यामुळे कोलंबो कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतासाठी ऋषभ पंतची दुखापत हा मोठा चिंतेचा विषय ठरला आहे.