मुंबई,
Shinde orders Education Department उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी नंदनवन बंगल्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तब्बल चार तास बैठक घेत राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेतला. शिक्षण विभागातील सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतल्यानंतर शाळांमधील चांगले बदल प्रत्येक विद्यार्थी आणि शाळेपर्यंत पोहोचविण्यासाठी मिशन मोडवर काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण करून शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तापूर्ण आणि दृश्यमान बदल घडविण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. शिक्षकांचे प्रशिक्षण, उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, पोषण, मध्यान्ह भोजन तसेच मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. केंद्राच्या शिक्षणविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही त्यांनी भर दिला.

शाळांच्या विकासात पालक, माजी विद्यार्थी आणि स्थानिक समाजाचा सहभाग वाढविण्यासोबतच आमदार आणि खासदारांनी आपल्या मतदारसंघातील शाळा दत्तक घेऊन निधी व स्थानिक संसाधनांच्या माध्यमातून योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच उद्योग आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या माध्यमातून तंत्रज्ञान, प्रशिक्षण, कौशल्य आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संपूर्ण कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा **दर आठवड्याला आढावा** घेतला जाणार असून, अडचणी दूर करून कामाला गती देण्यात येणार आहे.