शिरपूर येथील मोक्षधामात अत्याधुनिक शवपेटीचे लोकार्पण

सहयोग फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
शिरपूर जैन,
shirpurs mokshadham स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सहयोग फाउंडेशनच्या वतीने येथील आई भवानी मोक्षधाम परिसरात अत्याधुनिक शवपेटीचा (फ्रीझर बॉस) लोकार्पण सोहळा ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. परिसरातील नागरिकांची गरज ओळखून फाउंडेशनने राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर पार्थिव एक-दोन दिवस जतन करून ठेवण्यासाठी मालेगाव तालुयात कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. ही गैरसोय लक्षात घेऊन सहयोग फाउंडेशनने १ लाख रुपये खर्च करून ही शवपेटी मोक्षधामात उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध असून, तिची निगा व देखभालीसाठी नाममात्र शुल्क ठेवण्यात आल्याची माहिती सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. माणिक धूत यांनी दिली.
 
 
shirpurs mokshadham
 
कार्यक्रमादरम्यान असलम खा पठाण, शंकर वाघ आणि कैलास भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिरपूर हे सुमारे २५ ते ३० हजार लोकसंख्येचे महत्त्वाचे गाव असून, पोलिस ठाण्याच्या अंतर्गत ५० ते ६० खेडे येतात. परिसरात आगीच्या दुर्घटना घडल्यास मालेगाव, वाशीम किंवा रिसोड येथून अग्निशामक बंब येईपर्यंत मोठे नुकसान होते. त्यामुळे शिरपूर येथे कायमस्वरूपी अग्निशामक गाडी आणि अंत्यविधीसाठी प्रेतवाहक रथ उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी यावेळी केली.
 
 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशासक सरपंच सिंधुताई कांबळे होत्या. यावेळी माजी सरपंच इंदुताई इरतकर, माजी जि. प. उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे, डॉ. माणिक धूत, माजी सभापती संजय शर्मा, अशोक देशमुख, शिवसेना शहर प्रमुख कैलास राऊत, मोईब खा पठाण, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष भालेराव, गणेश इरतकर, संजय कोठारी, योगेंद्र मनाटकर, डॉ. आशिष वाघमारे, डॉ. अश्विन काटेकर, दिलीप विशंभर, संजय कानेड, बाळू भुरे, ओम सोनी, राहुल मनाटकर, आनंद देशमुख, शशिकांत देशमुख, रवी महाजन, नंदकिशोर गोरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार दामोदरजी सारडा यांनी मानले.