गर्भवती ASOचा संशयास्पद मृत्यू; सासरच्यांवर गंभीर आरोप

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
suspicious death of pregnant aso संरक्षण मंत्रालयात सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) म्हणून कार्यरत असलेल्या ३० वर्षीय नाझिया खानम यांचा द्वारका येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये मृत्यू झाला. २१ ऑगस्ट रोजी भरथल गावातील अपार्टमेंटमध्ये त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर नाझियाच्या आई-वडिलांनी तिचा पती आणि सासरच्या मंडळींवर शारीरिक व मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
 
suspicious death of pregnant aso
 
पोलिसांना २१ ऑगस्ट रोजी पहाटे ४.२१ वाजता सेक्टर २३ पोलीस ठाण्यात घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. संबंधित एसडीएमना याबाबत माहिती देऊन मृतदेह दीन दयाल उपाध्याय रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला.
 
नाझिया खानम यांचा विवाह ११ एप्रिल रोजी मोहम्मद आझम अली खान यांच्याशी झाला होता. सुरुवातीला २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या कुटुंबीयांनी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला होता. त्यावेळी सासरच्या मंडळींविरोधात कोणताही आरोप करण्यात आला नव्हता. मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजे २२ ऑगस्ट रोजी नाझियाच्या आई-वडिलांनी पुन्हा एसडीएमसमोर जबाब देत पती आणि सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली.
 
या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी सेक्टर २३ द्वारका पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून तपास सुरू केला. नाझियाचे वडीलांनी आपल्या मुलीला पती मोहम्मद आझम अली खान, सासू समीमुन निशा आणि सासरे बाबर अली खान यांच्याकडून सातत्याने शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. सासरच्या मंडळींकडून अपमान, मारहाण आणि धमक्या दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. नाझिया सुमारे तीन महिन्यांच्या गर्भवती होत्या, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. कथित छळाबाबत त्या फोनवरून आपल्या कुटुंबीयांना माहिती देत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, नाझियाचे पती मोहम्मद आझम अली खान यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात घटनेपूर्वी दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, नाझियाने त्यांना एका खोलीत बंद केले आणि त्यानंतर ती दुसऱ्या खोलीत गेली. आझम यांनी घरमालकाला याची माहिती दिली आणि घरमालकाने त्यांना बाहेर पडण्यास मदत केली. त्यानंतर नाझियाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस करत असून, मृत्यूमागील नेमके कारण आणि तक्रारीतील आरोपांची पडताळणी केली जात आहे.