तमिळनाडू
tamil film industry दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात मोठी आणि प्रभावशाली इंडस्ट्री मानल्या जाणाऱ्या तमिळ चित्रपटसृष्टीत सध्या अंतर्गत संघर्षाने उग्र रूप धारण केले आहे. थिएटर मालक आणि वितरकांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात तमिळ चित्रपट निर्मात्यांनी आता अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘तमिळ फिल्म प्रोड्युसर्स कौन्सिल’ आणि ‘तमिळ फिल्म ॲक्टिव्ह प्रोड्युसर्स असोसिएशन’ यांनी संयुक्त निवेदनाद्वारे 1 सप्टेंबर 2026 पासून एकही नवा तमिळ चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एवढेच नव्हे, तर नव्या चित्रपटांचे शूटिंग तसेच पोस्ट-प्रॉडक्शनची सर्व कामेही बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे अवघ्या तमिळ सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. निर्मात्यांच्या या आक्रमक भूमिकेमागे थिएटर मालक आणि वितरकांनी घेतलेले काही एकतर्फी निर्णय कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘तमिळनाडू थिएटर डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन’ आणि ‘थिएटर ओनर्स असोसिएशन’ यांनी एकत्रितपणे घेतलेल्या निर्णयानुसार, 1 सप्टेंबरपासून प्रदर्शित होणाऱ्या कोणत्याही नव्या तमिळ चित्रपटाचा ओटीटी प्रीमियर थिएटर रिलीजच्या तब्बल आठ आठवड्यांनंतरच केला जावा, अशी अट घालण्यात आली आहे. याशिवाय, नव्या चित्रपटांच्या वितरणासाठी निर्मात्यांना दिली जाणारी ॲडव्हान्स रक्कम पूर्णपणे बंद करण्याचा निर्णयही थिएटर मालकांनी घेतला आहे.
निर्मात्यांना विश्वासात न घेता इतका महत्त्वाचा निर्णय घेतल्याने निर्मात्यांच्या संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. धोरणात्मक निर्णय घेताना थिएटर ओनर्स असोसिएशनने तमिळ फिल्म प्रोड्युसर्स कौन्सिल, ॲक्टिव्ह प्रोड्युसर्स असोसिएशन किंवा इंडस्ट्रीतील अन्य कोणत्याही अधिकृत घटकाशी चर्चा केली नसल्याचा आरोप निर्मात्यांनी केला आहे. निर्मात्यांचे कोट्यवधी रुपयांचे बजेट आणि आर्थिक गणित धोक्यात आणणारे हे एकतर्फी नियम कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे.
याच निर्णयाच्या निषेधार्थ 1 सप्टेंबर 2026 पासून सर्व नव्या तमिळ चित्रपटांचे प्रदर्शन रोखण्याचा तसेच सुरू असलेली शूटिंग्ज बंद ठेवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. त्यामुळे या संघर्षाचा परिणाम केवळ चित्रपटांच्या प्रदर्शनावरच नव्हे, तर संपूर्ण निर्मिती प्रक्रियेवर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शूटिंग, चित्रपट प्रदर्शन tamil film industry आणि डबिंग-एडिटिंगसह पोस्ट-प्रॉडक्शनची कामे ठप्प झाल्यास त्याचा थेट परिणाम तमिळ चित्रपटसृष्टीतील हजारो तंत्रज्ञ, स्पॉटबॉय, दैनिक वेतनावर काम करणारे कर्मचारी आणि कलाकारांच्या रोजगारावर होऊ शकतो. त्यामुळे या गंभीर पेचप्रसंगातून लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी तमिळनाडू राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी कळकळीची विनंती निर्मात्यांच्या संघटनांनी केली आहे.
आता थिएटर मालक, वितरक आणि निर्मात्यांमधील हा वाद कोणत्या टप्प्यावर पोहोचतो आणि सरकारच्या हस्तक्षेपानंतर त्यावर तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण तमिळ चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.