‘मुंबई श्री’ ते ‘मिस्टर वर्ल्ड’; सागर माळीचा अंत

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
मुंबई,
The death of Sagar Mali शरीरसौष्ठव क्षेत्रात आपल्या दमदार शरीरयष्टीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सागर माळीचे वयाच्या ३८व्या वर्षी निधन झाले. ‘मुंबई श्री’पासून ‘मिस्टर वर्ल्ड’पर्यंतचा प्रवास करणाऱ्या सागरला त्याच्या पिळदार शरीरयष्टीमुळे ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ म्हणून ओळखले जात होते. २०१३ मध्ये प्रतिष्ठेचा ‘मुंबई श्री’ किताब पटकावल्यानंतर तो शरीरसौष्ठव क्षेत्रात चर्चेत आला होता.यानंतर सागरने ‘महाराष्ट्र श्री’ आणि ‘भारत श्री’ या स्पर्धांमध्येही आपली छाप पाडली. २०१४ मध्ये मुंबईत झालेल्या ‘मि. वर्ल्ड’ स्पर्धेत ८५ किलो वजनी गटात त्याने चौथे स्थान मिळवत आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली.
 
 

sagar  
 
 
२०२० मधील ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत सुनीत जाधवला त्याने दिलेली कडवी टक्करही शरीरसौष्ठवप्रेमींच्या स्मरणात आहे. २०१९ पर्यंत स्पर्धांमध्ये सक्रिय असलेला सागर कोरोना काळानंतर काही काळ स्टेजपासून दूर राहिला. गेल्या दोन वर्षांपासून सागर मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराशी झुंज देत होता. दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने त्याच्यावर नियमित डायलिसिस सुरू होते. अखेर या आजाराशी लढताना त्याची प्राणज्योत मालवली. सागरच्या पश्चात आई, वडील आणि पत्नी असा परिवार आहे. कुटुंबीय सध्या परदेशात असल्याने त्यांच्या आगमनानंतर रविवारी मुंबईतील मुलुंड येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.