समुद्रपूर
thieves शहरातील वार्ड १३ मध्ये बंद असलेल्या दोन घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. मात्र, या दोन्ही घरांमध्ये काहीच मिळाले नसल्याने साहित्यांची फेकाफेक करून अखेर चोरट्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. ही घटना २२ रोजी उघडकीस आली.
शहरातील वार्ड १३ मधील जयकिशोर मोरे आणि रमेश भोमले हे दोन्ही कुटुंब घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले. पैसे आणि सोन्या-चांदीचा ऐवजही सोबत घेऊन गेले होते. दरम्यान, घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील दिवाण, कपाट तसेच इतर सर्व ठिकाणी शोध घेतला. मात्र, चोरट्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. घरात काहीच न मिळाल्याने संतप्त झालेल्या चोरट्यांनी घरातील सर्व साहित्यांची फेकाफेक करून तेथून पळून गेले. मात्र, एकाच परिसरातील दोन बंद घरांना लक्ष्य करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.