होर्मुझ सामुद्रधुनीवर ट्रम्प यांचा दावा!

अमेरिकेचा नवा प्रदेश’ म्हणत नकाशा शेअर

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
वॉशिंग्ट,
trump's claim Strait of Hormuz अमेरिका आणि इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत केलेल्या नव्या दाव्यामुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ’ या सोशल मीडिया खात्यावर होर्मुझ सामुद्रधुनीचा नकाशा शेअर करत हा भाग अमेरिकेचा ‘नवीन प्रदेश’ असल्याचे म्हटले आहे.ट्रम्प यांनी शेअर केलेल्या नकाशासोबत, “अमेरिकेचा नवीन प्रदेश. होर्मुझची सामुद्रधुनी,” असा मजकूर लिहिला. याआधी १४ ऑगस्ट रोजी लाँग आयलंड येथे झालेल्या एका कार्यक्रमातही ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी लवकरच अमेरिकेचा प्रदेश म्हणून घोषित केली जाईल, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी त्यांनी याच भूमिकेचा पुनरुच्चार करत संबंधित नकाशा सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता.
 

trump 
 
होर्मुझ सामुद्रधुनीच्या नियंत्रणावरून अमेरिका आणि इराण यांच्यात आधीपासूनच संघर्ष सुरू आहे. ट्रम्प प्रशासनाकडून ही महत्त्वाची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी इराणवर दबाव टाकला जात आहे. दुसरीकडे, इराणने हा भाग आपल्या नियंत्रणाखाली असल्याचे स्पष्ट करत अमेरिकेच्या दाव्याला तीव्र विरोध केला आहे. या मुद्द्यावरून इराणने अमेरिकेला गंभीर परिणामांचा इशाराही दिला आहे.इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रझाई यांनीही होर्मुझ सामुद्रधुनीबाबत कठोर भूमिका मांडली आहे. अमेरिकेने आपल्या वचनबद्धता पूर्ण करून वर्तनात बदल करेपर्यंत ही सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेने आपली भूमिका बदलली आणि आश्वासने पूर्ण केली तर परिस्थिती बदलू शकते; मात्र केवळ चर्चा आणि वाटाघाटींमधून हा प्रश्न सुटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
इराणसोबतच्या युद्धापूर्वी होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील सुमारे एक पंचमांश तेल व्यापार होत होता. मात्र युद्ध सुरू झाल्यानंतर इतर वाहतुकीसाठी या महत्त्वपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत. इराणकडून जहाजांवर हल्ले होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, इराणकडून अमेरिकेसमोर नाकेबंदी उठवणे, युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करणे, आर्थिक निर्बंध हटवणे आणि जप्त केलेली इराणी मालमत्ता सोडणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीला अमेरिकेचा ‘नवीन प्रदेश’ संबोधल्याने अमेरिका-इराण संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे,