दोन सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
चंद्रपूर
criminals दोन सराईत गुन्हेगारांना चंद्रपूर जिल्हयातून एक महिन्याकरिता हद्दपार करण्यात आले आहे. अक्षय उर्फ सारंगधर दिगांबर संगीडवार (28, रा. सोनापूर, ता. नागभीड), जनार्धन रघुनाथ मेश्राम (50 , रा. चिखलगाव, ता. नागभीड) असे हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
 
criminal
 
आगामी सण आणि उत्सवांच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात कायदा, शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण व्हावा, यासाठी पोलिस प्रशासनाचे प्रतिबंधात्मक कारवायांचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.
तळोधी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या या दोन व्यक्तीविरूध्द सातत्याने गंभीर गुन्ह्यांची नोंद होत होती. यामध्ये अक्षय उर्फ सारंगधर संगीडवार याच्यावर तळोधी पोलिस ठाण्यात बेकायदेशीर रेती उपसा आणि चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तर जनार्धन मेश्राम याच्यावर दारूबंदी कायद्यान्वये अनेक गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या दोन्ही व्यक्तींची गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली होती आणि त्यांच्याकडून वारंवार सर्वसामान्यांना उपद्रव निर्माण केला जात होता. पोलिसांनी वेळोवेळी या दोघांवर प्रतिबंधक कारवाया केल्या होत्या, मात्र तरीही त्यांच्या वागणुकीत कोणतीही सुधारणा न होता त्यांचा उपद्रव सातत्याने वाढतच गेला.
नागरिकांमध्ये कायद्याचा दरारा राहावा आणि आगामी गणेशोत्सव, दुर्गोत्सव व इतर महत्त्वाच्या सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये, यासाठी या दोघांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली तळोधी पोलिस ठाण्याचे ठाणेदार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (अ) (1) अन्वये हद्दपारीचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून तो सक्षम प्राधिकरणाकडे सादर केला होता.
 
या प्रस्तावाची सखोल पडताळणी केल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी ब्रह्मपुरी यांनी दोन्ही गुन्हेगारांना एका महिन्याकरिता संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमांमधून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. शांतता भंग करणार्‍या किंवा बेकायदेशीर धंद्यांमध्ये लिप्त असणार्‍या समाजकंटकांवर यापुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.