लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये वैभवचे निराशाजनक पुनरागमन

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
बंगळूरु,
vaibhav suryavanshi दुलीप ट्रॉफी २०२६ मधील पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात ईस्ट झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन आमनेसामने आहेत. बंगळूरुच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे सुरू असलेल्या या सामन्यात नॉर्थ ईस्ट झोनने नाणेफेक जिंकून ईस्ट झोनला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे विशेष लक्ष लागले होते. मात्र, लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या वैभवला पहिल्याच डावात मोठी खेळी करण्यात अपयश आले.
 
vaibhav suryavanshi
 
वैभवने अभिमन्यू ईश्वरनसोबत ईस्ट झोनच्या डावाची सुरुवात केली. चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. मात्र, अवघ्या सहा चेंडूंचा सामना करत त्याने दोन चौकारांच्या मदतीने ८ धावा केल्या आणि त्याचा डाव संपला. डावाच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बिश्वरजीत कोंथौजमच्या गोलंदाजीवर वैभव झेलबाद झाला. जोसेफ लालथनखुमाने त्याचा झेल घेतला.
 
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वैभवची आतापर्यंतची कामगिरी विशेष प्रभावी राहिलेली नाही. त्यामुळे दुलीप ट्रॉफीतील या सामन्यात मोठी खेळी करत आपली कामगिरी सुधारण्याची त्याला संधी होती. मात्र, त्याला त्याचा फायदा उठवता आला नाही. या स्पर्धेसाठी वैभवची ईस्ट झोनच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. ईशान किशन संघाचे नेतृत्व करत असून, मोहम्मद शमी, मुकेश कुमार आणि शाहबाज अहमद यांसारखे अनुभवी खेळाडूही संघात आहेत.
 
गेल्या वर्षीचे अंतिम स्पर्धक असल्यामुळे मध्य विभाग आणि दक्षिण विभागाने उपांत्य फेरीतील स्थान आधीच निश्चित केले आहे. दुलीप ट्रॉफीतील दोन्ही उपांत्य सामने बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्सच्या ग्राउंड १ आणि ग्राउंड २ वर खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना ६ सप्टेंबर ते १० सप्टेंबरदरम्यान चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.