तभा वृत्तसेवा
हदगाव,
kalpana gaikwad केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महत्त्वपूर्ण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत नांदेड जिल्हा व हदगाव तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनात बरडशेवाळा येथे करण्यात आलेले विहीर पुनर्भरण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले आहे. बरडशेवाळा येथील सहायक कृषी अधिकारी कल्पना गायकवाड यांच्या मार्गदर्शनात गावात तब्बल 22 विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले. यामुळे सरासरीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झालेला असतानाही ऑगस्ट 2026 मध्ये या विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत.
कल्पना गायकवाड यांनी समूह सहायक अविनाश मस्के यांच्या सहकार्याने गावातील शेतकèयांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले. विहीर पुनर्भरणाचे महत्त्व शेतकèयांना पटवून देत त्यांनी पुनर्भरणाची कामे करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
या मार्गदर्शनामुळे अनेक शेतकऱ्यांनी विहीर पुनर्भरणाची कामे पूर्ण केली. त्याचा सकारात्मक परिणाम आता प्रत्यक्ष पाणीपातळी वाढीच्या रूपाने दिसून येत आहे. वहिरींमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे आगामी रबी हंगामातील हरभरा, गहू तसेच ऊस या पिकांना चांगला फायदा होईल, असा आशावाद शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेती उत्पादनातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. बरडशेवाळा येथील संताजी वटाणे, लक्ष्मी शिवाजी कदम, अशोक कदम, रंजना बालाजी दुर्गे, आनंद कदम, लक्ष्मी बालाजी कदम, गणेश कदम, विद्या सोनबा सावंत, शांता सावंत व गोकुर्णा दुर्गे यांच्यासह अनेक शेतकरी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. त्यांच्या विहिरी तसेच बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, या वाढलेल्या पाणीपातळीचा उपयोग केवळ शेतीसाठीच नव्हे, तर घरगुती पाण्याच्या गरजेसाठीही होत आहे. काही शेतकऱ्यांनी पाईपलाईनद्वारे विहिरीतील पाणी घरापर्यंत नेले आहे. त्यामुळे विहीर पुनर्भरणाचा उपक्रम शेतकऱ्यांसाठी दुहेरी फायदेशीर ठरत आहे.
बरडशेवाळा परिसरात पाणीटंचाईची समस्या नेहमीच जाणवते. त्यामुळे पाणीपातळीत झालेली वाढ ही गावासाठी महत्त्वाची बाब ठरली आहे. शेतकऱ्यांनी पाईपलाईनद्वारे पाणी गावात आणल्याने पाणीटंचाईवर काही प्रमाणात उपाय उपलब्ध झाला आहे.
जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता वाढवून शेतीला शाश्वत आधार देण्याच्या दृष्टीने बरडशेवाळा येथील विहीर पुनर्भरणाचा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.