नागपूर
world-record-set-by--dhol-tasha-players ‘वंदे मातरम्’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘भारत माता की जय’ च्या गगनभेदी घोषणा आणि प्रचंड उत्साह, अफाट ऊर्जा घेऊन आलेेल्या तरुणाईच्या साक्षीने आज रविवारी शहरातील रेशीमबाग मैदानावर अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात ४१०० वादक व ५८५ ध्वजधारींनी ढोलताशा महावादन करून तीन जागतिक विक्रम प्रस्थापित केले.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियासाठी ३०० ध्वजधारींची नोंदणी करण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात एकूण ५८५ ध्वजधारींनी या उपक्रमात सहभागी होत विश्वविक्रम आपल्या नावावर केला. समारंभाचे प्रमुख अतिथी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी या विश्वविक्रमाची घोषणा केल्यानंतर ‘मंथन फॉर युवा नागपूर २०२६’ चे संयोजक विष्णू चांगदे व रितेश गावंडे यांना प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे एडज्युरीकेटर मनोज तत्त्ववादी, वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाचे एडज्युरीकेटर डॉ. धीरज अग्रवाल आणि वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या समन्वयक रेणू जामदार आणि नचिकेत जामदार यांची उपस्थिती होती. या अभियानांतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्याथ्र्यांसह युवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेते युवक-युवती आणि विजेत्या गटांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. आरजे आमोद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील ‘युथ आयकॉन’ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात प्रसिद्ध क्रिकेटपटू तिलक वर्मा, बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, कॉमनवेल्थ गेम्स विजेते दिलीप गावीत, ‘गो झीरो’ आईसक्रीमचे किरण शर्मा आणि जेनेरिक आधारचे अर्जुन देशपांडे यांच्यासह आशिष भारतवंशी, डॉ. अजिंक्य कोटावार, विक्रम गंधे, अजिंक्य गंधे, मालविका बनसोड, श्रद्धा शौर्य, अल्फिया पठाण, सारंग लखानी, निर्भय संचेती, वरुण पारेख, दक्ष खंते, राघव नुवाल, सुरभी शिरपूरकर, मिथिलेश वझलवार, कार्तिक गुरनुले आणि डॉ. नमायरा सिद्दिकी यांचा समावेश होता.
यावेळी नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना ‘ड्रग फ्री महाराष्ट्र’ची शपथ दिली. याशिवाय, उपस्थित युवा कलाकारांनी मान्यवरांचे लाईव्ह पोर्ट्रेट साकारले. युवा कलाकारांनी साकारलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोर्ट्रेट त्यांना यावेळी प्रदान करण्यात आले. गायक-संगीतकार पुनीत कुशवाह आणि गायिका स्नेहा उमरेडकर यांच्या विशेष भजन जुगलबंदीने युवकांना गाण्यासोबतच थिरकायलाही भाग पाडले.