घटस्फोटानंतर आदिनाथ कोठारेची नवी इनिंग

यामी गौतमसोबत ‘नई नवेली’मध्ये झळकणार

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
मुंबई
adinath kothare अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत परस्पर संमतीने घटस्फोट घेतल्याची अधिकृत घोषणा केली. या निर्णयामुळे दोघांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, आता आदिनाथ कोठारे आपल्या खासगी आयुष्यामुळे नव्हे, तर व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्यानंतर आदिनाथने आता बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे.
 

adinath kothare in nai naveli with yami gautam: new bollywood film release date revealed 
‘रामायण’ या आगामी सिनेमात भरतची भूमिका साकारणारा आदिनाथ आता आणखी एका बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नई नवेली’ या सिनेमात त्याची मुख्य भूमिका असणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री यामी गौतम त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे आदिनाथ आणि यामीची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘नई नवेली’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी बालाजी मोहन यांच्यावर आहे. उपलब्ध माहितीनुसार, या सिनेमाची कथा कौटुंबिक मनोरंजनाभोवती फिरणारी असून, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आदिनाथ आणि यामी पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याने त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.आदिनाथचा बॉलिवूडमधील प्रवास ‘रामायण’ आणि ‘नई नवेली’ या दोन सिनेमांमुळे अधिक चर्चेत आला आहे. याशिवाय तो मराठी छोट्या पडद्यावरही पुनरागमन करणार असून, एका मालिकेच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा मुहूर्तही पार पडला आहे. त्यामुळे चित्रपट, ओटीटी, टेलिव्हिजन अशा विविध माध्यमांमध्ये आदिनाथ सक्रिय होताना दिसत आहे.समोर येत असलेल्या माहितीनुसार, ‘नई नवेली’ हा सिनेमा ओटीटी आणि टेलिव्हिजन अशा तिन्ही माध्यमांवर एकाच वेळी प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आदिनाथच्या आगामी प्रोजेक्ट्सची सध्या मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे.दरम्यान, आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी घटस्फोटाची घोषणा करताना त्यांच्या वैवाहिक नात्याचा प्रवास परस्पर संमतीने संपवत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यांच्या मुलीसाठी ते कायम एकत्र राहणार असल्याचेही दोघांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले होते. खासगी आयुष्यातील या मोठ्या निर्णयानंतर आदिनाथ आता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करताना दिसत असून, त्याच्या आगामी बॉलिवूड प्रोजेक्ट्सकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.