सुटकेसमध्ये महिलेच्या मृतदेहाचे तुकडे

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
आग्रा
agra suitcase murder case आग्रा कँट रेल्वे स्थानकावर ट्रेनच्या जनरल डब्यात महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडल्याने खळबळ उडालेल्या प्रकरणाचा तपास आता चेन्नईपर्यंत पोहोचला आहे. ६ ऑगस्ट रोजी रेल्वे स्थानकावर एका लाल रंगाच्या सुटकेसमध्ये महिलेच्या मृतदेहाचे कुजलेले तुकडे आढळले होते. या प्रकरणाचा छडा लावताना पोलिसांना चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकावरील CCTV फुटेजमधून महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत.
 

agra suitcase murder case  
आग्रा कँट स्थानकावर ६ ऑगस्ट रोजी ट्रेनच्या जनरल डब्यात लाल रंगाची सुटकेस आढळली होती. या सुटकेसमधून काहीतरी बाहेर येत असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बॅगची तपासणी केली. त्यावेळी त्यामध्ये महिलेच्या मृतदेहाचे कुजलेले तुकडे असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या हत्येचा तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांना चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकावरील CCTV फुटेजमध्ये एक पुरुष आणि एक महिला लाल रंगाची सुटकेस घेऊन येताना दिसून आले. दोघांनी ही सुटकेस दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या तमिळनाडू एक्स्प्रेसमध्ये ठेवली होती. या दृश्यांच्या आधारे पोलिसांनी दोघांचा माग काढण्यास सुरुवात केली असून, तपासाची दिशा आता चेन्नईकडे वळली आहे.
पोलिसांचा तपास चेन्नईतील गुडुवनचेरी  agra suitcase murder case परिसरातील एका भाड्याच्या घरापर्यंत पोहोचला आहे. प्राथमिक तपासानुसार महिलेची हत्या याच घरात झाली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घराच्या छताला महिलेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मृतदेहाचे काही तुकडे बिर्याणी बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या भांड्यात ठेवण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.दरम्यान, या प्रकरणातील पुरुष आणि महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. दोघांचे एकमेकांशी नेमके काय नाते होते, हेही स्पष्ट झालेले नाही. मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी CCTV फुटेज, रेल्वेचे रेकॉर्ड आणि फॉरेन्सिक तपासाचा आधार घेतला जात आहे.
महिलेची हत्या नेमकी कोणी केली, तिचा मृतदेह तुकडे करून सुटकेसमध्ये का ठेवण्यात आला आणि या हत्येमागील कारण काय होते, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. चेन्नईपासून आग्र्यापर्यंत मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.