गुन्हेगारांना सोडणार नाही

दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
अमरावती/मुंबई 
amravati hospital fire अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता कक्षात (SNCU) सोमवारी पहाटे भीषण आग लागून तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. व्हेंटिलेटरचा अचानक स्फोट होऊन आग लागल्याचे सांगितले जात असून, या दुर्घटनेत सहा बाळांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यापैकी काहींची प्रकृती अद्याप चिंताजनक असून, त्यांच्यावर शेजारील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र दुःख व्यक्त करत दुर्घटनेला कारणीभूत ठरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
 

amravati hospital fire 
माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, या दुर्घटनेची चौकशी झाल्यानंतर नेमके कारण समोर येईल. तांत्रिक चूक झाली असेल किंवा अग्निशमन व्यवस्थेत काही बिघाड अथवा त्रुटी असेल, तर त्यासंदर्भातील अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर भाष्य केले जाईल. मात्र, अशा घटना पुन्हा राज्यात किंवा अमरावतीमध्ये घडू नयेत, यासाठी सरकार आवश्यक ती काळजी घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या दुर्घटनेवरून राजकारण करू नये, असे आवाहनही बावनकुळे यांनी केले. हा गरीब-श्रीमंताचा वाद नसून रुग्णालयातील तांत्रिक बाबींची चौकशी महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटले. अमरावतीच्या माजी पालकमंत्र्यांनी रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी भेट दिली होती की राजकारण करण्यासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तांत्रिक बाबींमध्ये चूक आढळल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, बावनकुळे यांनी सोशल मीडियावरही या दुर्घटनेबाबत पोस्ट करत दुःख व्यक्त केले आहे. अमरावतीमधील दुर्घटनेमुळे आपण अत्यंत दुःखी झालो असून मन हेलावून गेले आहे, असे त्यांनी म्हटले. दगावलेल्या नवजात बालकांना व्यथित अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या पालकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी केली. या घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले.
जखमी बालकांवर उपचार सुरू amravati hospital fire  असून त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय मदत दिली जात आहे. मृत बालकांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सरकार उभे असून सरकार आणि प्रशासनाकडून संपूर्ण मदत केली जात असल्याचे बावनकुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. आपण जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात असून आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत. प्रशासन या परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले.बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे सुमारे चार वाजता आग लागली. या विभागात उपचार घेत असलेल्या तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. काही बालकांना पुढील उपचारांसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यापैकी चार बालकांवर उपचार सुरू आहेत. त्यातील एका बालकाची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
आग लागताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने धावपळ करत इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. SNCUमध्ये कमी दिवसांचे, कमी वजनाचे तसेच गंभीर अवस्थेतील नवजात बालकांवर उपचार केले जातात. त्यामुळे या दुर्घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. या घटनेबद्दल जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तीव्र दुःख व्यक्त करताना दोष निश्चित झाल्यानंतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.