मुंबई
anangsha biswas ‘मिर्झापूर’ ही सीरिज पाहिली नसेल असा क्वचितच कोणी असेल. या मालिकेतील पात्रे आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहेत. ‘मिर्झापूर’मुळे अनेक कलाकारांना नवी ओळख मिळाली. अभिनेत्री अनंग्शा बिस्वास हिनेही या सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. या भूमिकेमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली, मात्र या प्रसिद्धीची तिला मोठी किंमतही मोजावी लागली. एका मुलाखतीत अभिनेत्रीने ‘मिर्झापूर’नंतर आलेल्या धक्कादायक अनुभवांचा खुलासा केला आहे.
अनंग्शा बिस्वासने सांगितले की, ‘मिर्झापूर’मधील तिची भूमिका पाहिल्यानंतर काही लोकांनी तिच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने विचार करण्यास सुरुवात केली. पहिल्या सीझननंतर तिला अनेक विचित्र ई-मेल आणि कमेंट्सचा सामना करावा लागला. या प्रकारामुळे ती पूर्णपणे त्रस्त झाली होती. तिच्यासाठी हे सर्व नवीन असल्याने या अनुभवाचा तिला मोठा धक्का बसला. काही लोकांनी तिचा अपमानही केला, असे तिने सांगितले.
आपल्या अनुभवाबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की, तिच्याबद्दल घाणेरड्या गोष्टी ऐकल्यानंतर तिला फार मोठा धक्का बसला होता. तिच्यासाठी अभिनय आणि तिचे काम हे सरस्वतीसमान असल्याचेही तिने स्पष्ट केले. लोक तिच्याबद्दल अशा पद्धतीने का बोलत आहेत, हे सुरुवातीला तिला समजत नव्हते. मात्र, हळूहळू प्रत्येकजण आपल्या कामाचे कौतुक करेलच असे नाही, हे तिच्या लक्षात आले. काही लोकांना तिचे काम आवडले, तर काहींनी त्याला विरोध केला.
‘मिर्झापूर’मध्ये तिने झरीना ही व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेचा आपल्या खऱ्या आयुष्याशी कोणताही संबंध नसल्याचे अभिनेत्रीने स्पष्ट केले. मात्र, सीरिज पाहिल्यानंतर काही लोकांना आपण खऱ्या आयुष्यातही झरीना याच व्यक्तिरेखेसारखी असल्याचे वाटू लागले. त्यानंतर तिला अत्यंत विचित्र स्वरूपाचे संदेश मिळू लागले.
अनंग्शाने सांगितले की, काही जण तिला एका रात्रीसाठी किती पैसे घेणार, असे विचारत होते, तर काही जण दोन दिवस त्यांच्यासोबत परदेशात येण्याची ऑफर देत होते. अशा प्रकारच्या संदेशांनी तिचा मेलबॉक्स भरून गेला होता. हे अनुभव आपल्यासाठी अत्यंत त्रासदायक असल्याचेही तिने स्पष्ट केले.
“खऱ्या आयुष्यात मी झरीना सारखी नाही,” असे सांगताना अभिनेत्रीने भूमिका आणि कलाकाराचे वास्तव आयुष्य यामध्ये फरक करण्याचे आवाहन केले. कलाकार पडद्यावर एखादी व्यक्तिरेखा साकारत असतो; मात्र त्याचा अर्थ तो कलाकार खऱ्या आयुष्यातही तसाच आहे, असा होत नाही. लोकांनी हा फरक समजून घेणे आवश्यक असल्याचे तिने म्हटले.
‘मिर्झापूर’नंतर लोक आपल्याला अनंग्शा म्हणून नव्हे, तर झरीना म्हणूनच पाहू लागले, असेही अभिनेत्रीने सांगितले. आपण केवळ एक भूमिका साकारत होतो आणि ती व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारल्यामुळेच कदाचित प्रेक्षकांना ती खऱ्या आयुष्यातही तशीच असल्याचा गैरसमज झाला, असे तिने नमूद केले. मात्र, लोकांनी थोडी अधिक संवेदनशीलता दाखवली असती, तर आपल्या अभिनयकौशल्याची नक्कीच दखल घेतली असती, अशी खंतही अनंग्शा बिस्वासने व्यक्त केली आहे.
‘मिर्झापूर’मधील भूमिकेमुळे मिळालेल्या प्रसिद्धीसोबतच आलेल्या या कटू अनुभवांमुळे अभिनेत्रीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. पडद्यावरील भूमिका आणि कलाकाराचे वैयक्तिक आयुष्य यांच्यात फरक करण्याची गरज असल्याचा महत्त्वाचा मुद्दाही तिच्या अनुभवातून समोर आला आहे.