लखनऊ,
announcement by Yogi government रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील महिलांसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील महिलांना २७ ऑगस्ट सकाळी ६ वाजल्यापासून २९ ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत उत्तर प्रदेश राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या (UPSRTC) बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. यापूर्वी ही सुविधा दोन दिवसांसाठी देण्यात आली होती; मात्र मुख्यमंत्री योगी यांनी त्यात वाढ करून तीन दिवसांची केली आहे.या सुविधेअंतर्गत एका महिला प्रवाशासोबत एका सोबत्यालाही मोफत प्रवास करता येईल. मात्र, महिलेसोबत एकापेक्षा अधिक व्यक्ती असल्यास केवळ महिला आणि तिच्या एका सोबत्याचे तिकीट मोफत राहील. त्यापेक्षा अधिक प्रवाशांना नियमानुसार पूर्ण भाडे भरावे लागणार आहे.

रक्षाबंधनाच्या काळात महिलांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांचा सुरक्षित परतीचा प्रवास सुनिश्चित व्हावा, यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परिवहन विभाग, पोलीस, प्रशासन आणि संबंधित विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी परिवहन महामंडळ व विभाग, नगरविकास, पोलीस आणि वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली.सणाच्या काळातील प्रवासी वाढ लक्षात घेऊन नगरविकास विभागाच्या ९०० हून अधिक बसेसची व्यवस्था करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खासगी बस, ऑटो आणि टॅक्सी चालकांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच २५ ऑगस्टपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये बस, टॅक्सी आणि ऑटो-टेम्पो संघटनांसोबत समन्वय बैठका घेण्यास सांगण्यात आले आहे. रक्षाबंधनाच्या काळात प्रमुख धार्मिक आणि पर्यटनस्थळांवरही विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. मथुरा-वृंदावन, अयोध्या, वाराणसी, प्रयागराज, चित्रकूट, विंध्याचल-मिर्झापूर आणि गोरखपूर या प्रमुख ठिकाणी गर्दी लक्षात घेऊन विशेष नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.