‘महाभारत’मधील कृपीची भूमिका गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
मुंबई
asha singh jaiswal death बॉलिवूड आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. बी. आर. चोप्रा यांच्या गाजलेल्या ‘महाभारत’ मालिकेसह अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंह जयसवाल यांचे निधन झाले. २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या दीर्घकाळापासून आजारी असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
asha singh jaiswal death mahabharat actress passes away at | career, kripi role & tribute
आशा सिंह जयसवाल यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा आकाश सिंह यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईच्या निधनाची माहिती देताना आकाश यांनी त्यांच्या कर्तृत्वासोबतच सामाजिक योगदानाचाही आवर्जून उल्लेख केला.
आशा सिंह जयसवाल या केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे, तर समाजसेविका आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणूनही परिचित होत्या. भारतातील पहिल्या महिला मिमिक्री आर्टिस्टपैकी एक म्हणून त्यांची ओळख होती. विशेष म्हणजे, प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करण्यासाठीही त्या ओळखल्या जात होत्या. मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा विस्तार त्यांनी ‘आशा इव्हेंट्स अँड फिल्म्स’ या मनोरंजन व्यवस्थापन कंपनीची स्थापना करूनही केला होता.
आशा सिंह जयसवाल यांनी १९७०च्या दशकापासून मनोरंजन क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारल्या. मात्र, बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेतील कृपीची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील विशेष गाजलेली भूमिका ठरली.
‘महाभारत’मध्ये त्यांनी कृपीची भूमिका साकारली होती. कृपी ही गुरु कृपाचार्यांची बहीण, गुरु द्रोणाचार्यांची पत्नी आणि अश्वत्थामाची आई होती. या भूमिकेमुळे आशा सिंह जयसवाल यांना घराघरात ओळख मिळाली आणि त्या हिंदी टेलिव्हिजन विश्वातील परिचित चेहरा बनल्या.
आईला श्रद्धांजली वाहताना आकाश सिंह यांनी त्यांना मेहनती आणि खंबीर महिला म्हणून संबोधले. त्यांच्या आयुष्यात कामाला सर्वाधिक महत्त्व होते, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. तसेच चाहत्यांनी आणि त्यांच्या परिचितांनी त्यांचे काम पाहून त्यांना कायम स्मरणात ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.आशा सिंह जयसवाल यांच्या निधनाने हिंदी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनयासोबतच मिमिक्री, समाजसेवा आणि मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या बहुआयामी योगदानाची आठवण कायम राहणार आहे. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वाने एक ज्येष्ठ आणि बहुआयामी कलाकार गमावला आहे.