एटीएम बदलून फसवणूक करणार्‍यास अटक

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
वर्धा
atm card swap fraud एटीएम कार्डची अदलाबदल करून नागरिकांच्या खात्यातून पैसे काढणार्‍या आंतरराज्यीय आरोपीला सेलू पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून विविध बँकांचे एटीएम कार्ड, गुन्ह्यात वापरलेली कार, मोबाईल फोन आणि रोख रकमेसह ५ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील दुसर्‍या आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

atm card swap fraud accused arrested in wardha, ₹5.17 lakh property seized
सुकळी (स्टे.) येथील लीलाधर नागपूरकर (४३) हे सेलू येथील मेडिकल चौकातील एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढत होते. यावेळी दोन अनोळखी व्यतींनी त्यांना बोलण्यात गुंतवले. त्याचवेळी एकाने नजर चुकवून नागपूरकर यांचे एटीएम कार्ड बदलले आणि दोघेही कारने पसार झाले. घरी गेल्यानंतर नागपूरकर यांनी फोन-पेच्या माध्यमातून खात्यातील शिल्लक तपासली असता रकम कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ सेलू पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी बँकेत जाऊन खात्याचे स्टेटमेंट तपासले असता आरोपींनी घोराड येथील एका एटीएममधून बदललेल्या एटीएम कार्डचा वापर करून पिनच्या साहाय्याने १६ हजार रुपये काढल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सेलू पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी आरोपींची छायाचित्रे मिळवली आणि माहितीदारांचे जाळे सक्रिय केले. दरम्यान, २३ ऑगस्ट रोजी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणार्‍याशी साधर्म्य असलेली व्यती नागपूर येथील हुडकेश्वर नाका परिसरात पांढर्‍या रंगाच्या कारमधून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सेलू पोलिसांचे पथक तातडीने नागपूरला रवाना झाले. तेथे अजहरुद्दीन ताहिर हुसैन (३६) रा. टोंका, ता. हथीन, जि. पलवल, हरियाणा याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून विविध बँकांचे एटीएम कार्ड, गुन्ह्यात वापरलेली पांढर्‍या रंगाची कार, मोबाईल फोन आणि फसवणुकीतील रकम असा ५.१७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील दुसर्‍या आरोपीचा शोध सुरू आहे.