राजेश माहेश्वरी
आर्णी,
har har mahadev आर्णी तालुक्यातील दाभडी येथे प्राचीन जागृत हेमाडपंथी ओंकारेश्वर व कमळेश्वर महादेव मंदिरांत श्रावणात भक्तांची मांदियाळी आणि ‘हर हर महादेव’चा गजर सुरू असतो. या दोन्ही मंदिरांना पौराणिक इतिहास आहे. हेमाद्री किंवा हेमाडपंत हे देवगिरीचा राजा रामदेवराय यांचे प्रधान व शिवभक्त होते. जेथे जायचे तेथे आपल्या खास शैलीत भव्य शिवालय बांधून घ्यायचे. त्यामुळे त्यांना हेमाडपंथी मंदिर म्हणतात. हे मंदिर साधारण 12 व्या शतकात बांधलेले असावे.
श्री ओंकारेश्वर मंदिराच्या आत 5 फुटांची भव्य पिंड आहे. ही शिवपिंड अत्यंत कोरीव व सुबक असून संपूर्ण भारतात पहावयास मिळणार नाही, असे मानतात. मंदिराबाहेरील गाभाऱ्यात 9 खांब व 9 दरवाजे आहेत. हे 9 खांब हे जणू 9 ग्रहांचे प्रतीक आहेत.
श्री नंदिकेश्वर मुख्य मंदिरात 5 फूट उंच बसलेला नंदी आहे. श्री ओंकारनाथ व नंदी यांच्या मध्ये एक खांब आडवा येतो. त्यामुळे नंदी ओंकारनाथांकडे तिरपी मान करून पाहत अस्ल्याने या नंदीची मान तिरपी आहे. मुख्य मंदिरात प्रवेश करताच दोन्ही बाजूंना भुयार पद्धतीच्या खोल्या आहेत. पूर्वी तेथे बसून शिवआराधना केली जात असे. मुख्य मंदिराला लागूनच 6 फूट उंचीचे तुळशी वृंदावन आहे. त्याच्या चारही बाजूंना 1 फूट रुंदीच्या खिडक्या व चारही कोपऱ्यांत 4 वानर मूर्ती आहेत.
भव्य असे श्री कमळेश्वर मंदिरसुद्धा हेमाडपंथी आहे. येथील शिवपिंड ही दुभागलेली आहे. एकेकाळी गावातील एक साध्वी नित्य मध्यरात्री महादेवाच्या आराधनेला यायची. ती असे नियमित करायची, पण तिच्या पतीने तिच्यावर संशय घेतला आणि तिला जिवे मारण्याचा कट रचला. पती तिचा पाठलाग करत असताना तिला कळून चुकले की तो तिला जीवे मारण्यासाठी पाठलाग करतोय. ती लगेच मंदिरात पोचून प्रार्थना केली की, तिला शिवाने पोटात घ्यावे. तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शिवपिंड दुभंगली आणि तिला पोटात घेतले. आजही ती शिवपिंड दुभंगल्या अवस्थेत आहे.
कमळेश्वर मंदिरासमोरच हनुमान मंदिर आहे. त्यास परदेशी हनुमान म्हटल्या जाते. 1911 साली तपस्वी मनुदास महाराज हे हनुमंताची मूर्ती इतरत्र स्थापन करायला नेत असताना त्यांची बैलगाडी येथे थांबली. ही बैलगाडी समोर जातच नव्हती. सारे प्रयत्न असफल झाले म्हणून मनुदासांनी मूर्ती येथेच स्थापित केली. मनुदास हे परदेशी असल्यामुळे हा ‘परदेशी हनुमान..’
मंदिराच्या बाजूला 31 फूट खोल, 12 पायèयांचे पाण्याचे कुंड आहे. पूजेकरिता हेच पाणी वापरतात. भक्तगण ग्रहण व कुंभ काळात या कुंडात पवित्र स्नान करतात. या कुंडाला बारव कुंड असेही म्हटल्या जाते. येथेच भव्य ओट्यावर पिंडी आहेत यांना एकलिंगी महादेवाच्या पिंडी असेही म्हणतात.
मंदिर परिसरात एक भव्य हनुमान मंदिर आहे. या मंदिरातील हनुमान मूर्ती अंदाजे साडेपाच फूट उंच आहे. मूर्ती अत्यंत आकर्षक असून तिचे दर्शन अत्यंत फलदायी मानतात. या मंदिर परिसरात नागाच्या मूर्ती, एक दगडाचे मोठे जाते, ज्योतिर्लिंग मंदिर, हनुमानाचे मंदिर, दत्तमंदिर, गणपती मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संत ज्ञानेश्वर मंदिर, संत तुकाराम मंदिर, संत गजानन मंदिर, संताजी मंदिर आहेत.