मोठी बातमी...गोधनीत क्लोरिन गॅसची गळती!

४०हून अधिक जणांना मळमळ, उलट्यांचा त्रास

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Chlorine gas leak in Godhani नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमध्ये रविवारी मध्यरात्री सुमारे ३ वाजता क्लोरिन गॅसची गळती झाल्याने खळबळ उडाली. गॅस परिसरात पसरल्याने ४०हून अधिक स्थानिकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच १५ पेक्षा अधिक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
 
gys
 
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून प्लांटच्या २०० मीटर परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले. घटनास्थळी एनडीआरएफचे पथक तसेच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे पथक दाखल झाले असून गॅस गळतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बचावकार्य सुरू आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला प्लांटमधील कर्मचाऱ्यांना गॅस गळती झाल्याचे लक्षात आले. मात्र, तोपर्यंत क्लोरिन गॅस हळूहळू आसपासच्या परिसरात पसरला होता. त्यामुळे प्लांट परिसरातील नागरिकांना त्रास जाणवू लागला. काही नागरिकांना मळमळ, उलट्या तसेच श्वास घेण्यास अडचणी निर्माण झाल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एनडीआरएफ आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. परिसरात खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत असून नागरिकांमध्ये मात्र या घटनेमुळे भीतीचे वातावरण आहे. क्लोरिन गॅसची गळती नेमकी कशामुळे झाली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन विभागाकडून या घटनेचा तपास सुरू आहे.