चामोर्शी,
death of mother and baby चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात रविवारी प्रसूतीसाठी दाखल झालेल्या 27 वर्षीय जिजा हंसराज सातर या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच तिच्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झाला. डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
जिजा सातर यांना रविवारी पहाटे 5 वाजता प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कर्तव्यावर डॉक्टर उपस्थित नसल्याने उपचारास विलंब झाल्याचा आरोप आहे. सुमारे साडेदहा वाजता डॉक्टर आल्यानंतर तपासणी करून महिलेला गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. त्यावेळी प्रसूतीची प्रक्रिया सुरू झाली होती. गडचिरोलीला पोहोचेपर्यंत गर्भातील बाळाचा मृत्यू झाला.
त्यानंतर महिलेवर उपचार सुरू असताना सायंकाळी अतिरक्तस्राव झाला. रात्री 7 वाजता तिला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले; मात्र रात्री साडेनऊच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.death of mother and baby मृत जिजा यांची ही पहिलीच प्रसूती होती.
या प्रकरणी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील संबंधित डॉक्टर प्रवीण किलनाके यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, तसेच कर्तव्यावर अनुपस्थित डॉक्टरांची चौकशी करावी, अशी मागणी नातेवाईकांनी पत्रकार परिषदेत केली. डॉ. देवरा यांच्या खासगी सोनोग्राफी केंद्राचीही चौकशी करून दोष आढळल्यास कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.