धोनीचा आणखी एक विक्रम पंतच्या नावावर!

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
कोलंबो,
Dhoni's record now to Pant's name भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीत आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ६३ धावांच्या खेळीदरम्यान पंतने माजी कर्णधार आणि दिग्गज यष्टीरक्षक एम.एस. धोनीचा विक्रम मागे टाकला. परदेशी किंवा तटस्थ मैदानांवर कसोटी क्रिकेटमध्ये २५०० धावा पूर्ण करणारा पंत हा पहिला भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ठरला आहे.कोलंबो कसोटीपूर्वी पंतच्या परदेशातील कसोटी धावांची संख्या २,४९६ होती. ६३ धावांच्या खेळीमुळे त्याने २५०० धावांचा टप्पा ओलांडला. यापूर्वी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. धोनीने परदेशी किंवा तटस्थ मैदानांवर कसोटीत २,४९६ धावा केल्या होत्या.
 
 
Dhoni
 
या कामगिरीत पंतची फलंदाजीची सरासरीही प्रभावी राहिली आहे. त्याने परदेशातील कसोटींमध्ये सुमारे ४२च्या सरासरीने धावा केल्या आहेत, तर धोनीची सरासरी ३२.८४ होती. या यादीत फारुख इंजिनिअर १,२०९ धावांसह तिसऱ्या आणि सय्यद किरमानी १,१०९ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहेत.कोलंबो कसोटीच्या पहिल्या दिवशी हाताला दुखापत झाल्यामुळे पंतला मैदान सोडावे लागले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा मैदानात उतरत श्रीलंकेच्या गोलंदाजांचा सामना केला आणि ६३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या डावात त्याने ध्रुव जुरेलसोबत ११२ धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत नेण्यास हातभार लावला.
 
 
पंत आता धोनीच्या आणखी काही विक्रमांच्या जवळ पोहोचला आहे. धोनीने ९० कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत ४,८७६ धावा केल्या आहेत, तर पंतने आतापर्यंत ५२ कसोटींमध्ये ३,७२५ धावा केल्या आहेत. कसोटी शतकांच्या बाबतीत मात्र पंतने धोनीला आधीच मागे टाकले आहे. धोनीच्या नावावर सहा शतके आणि ३३ अर्धशतके आहेत, तर पंतने आतापर्यंत आठ शतके आणि २१ अर्धशतके झळकावली आहेत.