ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे १०१व्या वर्षी निधन

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
पुणे
Dr. Yasmin Sheikh मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या १०१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि व्याकरण विश्वातील एक व्रतस्थ, अभ्यासू आणि भाषेच्या शुद्धतेसाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेली व्यक्ती हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना या दोन मुली आहेत.
 

Dr. Yasmin Sheikh dies at 101: veteran Marathi grammarian and linguist passes away 
जन्माने ज्यू असलेल्या डॉ. यास्मिन शेख यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरुषा रुबेन असे होते. ज्येष्ठ साहित्यिक वसंत कानेटकर यांच्या पुढाकारातून त्यांची नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या अझीझ अहमद इब्राहिम शेख, अर्थात डॅडी शेख, यांच्याशी भेट झाली. त्यानंतर १९५० मध्ये दोघांनी विवाह केला. त्यांनी स्वतःचा धर्म बदलला नाही; मात्र जेरुषा रुबेन हे नाव बदलून ‘यास्मिन शेख’ हे नाव स्वीकारले.
प्रा. श्री. म. माटे यांच्या विद्यार्थिनी असलेल्या डॉ. यास्मिन शेख यांनी श्री. पु. भागवत आणि वसंत कानेटकर यांसारख्या दिग्गज साहित्यिकांसोबत काम केले. पुढे भाषाशास्त्र आणि व्याकरणाच्या अभ्यासाला त्यांनी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले. मराठी भाषेच्या समृद्धीसोबतच तिच्या शुद्धतेसाठीही त्यांनी कायम स्पष्ट आणि कठोर भूमिका मांडली.
मराठी बोलताना परकीय शब्दांचा वापर सहजपणे करण्याची प्रवृत्ती वाढत आहे; मात्र असे करताना आपणच आपल्या भाषेचे प्रदूषण करीत आहोत, याचे भान असले पाहिजे, असे त्या सांगत. बोली भाषा कोणत्याही स्वरूपाची असली तरी वैचारिक लेखन आणि ललित वाङ्मय लिहिताना प्रमाण भाषेचा वापर झाला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.
अध्यापन क्षेत्रातही डॉ. शेख यांनी दीर्घकाळ योगदान दिले. मुंबईच्या ‘स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर’मध्ये त्यांनी आयएएसच्या विद्यार्थ्यांना तब्बल १० वर्षे व्याकरण आणि भाषाशास्त्र शिकवले. मुंबईतील शीव (सायन) येथील SIES महाविद्यालयात सहा वर्षे मराठी विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या एकूण अध्यापनाचा कालावधी ३४ वर्षांचा होता.
बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांच्या संपादनातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. त्यांनी सात वर्षे बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांचे संपादन केले. प्रसिद्ध ‘कार्यात्मक व्याकरण’ या पुस्तकाच्या निर्मितीतही त्यांचा मुख्य सहभाग होता.
मराठी भाषा आणि व्याकरणाच्या  Dr. Yasmin Sheikh क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित ‘डॉ. अशोक केळकर सन्मान’ त्यांना प्रदान करण्यात आला होता. तसेच शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नांदी संमेलनात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता.
मराठी भाषेच्या अभ्यासाला, व्याकरणाच्या शिस्तीला आणि प्रमाण भाषेच्या आग्रहाला आयुष्यभर वाहून घेतलेल्या डॉ. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे.