अनिल कांबळे
नागपूर,
operation wrong side शहरातील रस्त्यांवर विरुद्ध दिशेने अर्थात रॉंग साईडने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट न घालणे यासह वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना आता चांगलेच महागात पडणार आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरुद्ध केवळ दंडात्मक कारवाई न करता गंभीर प्रकरणांत थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया नागपूर पोलिसांनी सुरू केली आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन रॉंग साईड’ राबविण्यात येत आहे. सोनेगाव वाहतूक पोलिसांनी रॉंगसाईड वाहन चालविणाऱ्या एका अल्पवयीन मुलाच्या वडिलावर गुन्हा दाखल करुन पहिल्या कारवाईची नोंद केली आहे.

शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहनचालकांकडून शॉर्टकटच्या नावाखाली रॉंग साईडने वाहने चालविली जातात. काही वाहनचालक सिग्नलवर थांबण्याऐवजी विरुद्ध दिशेने वाहन नेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याचा धोका वाढतो. विशेषतः गर्दीच्या रस्त्यांवर अशा प्रकारामुळे अपघात तसेच वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. रॉंग साईड वाहन चालविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे पथक विविध चौक व प्रमुख मार्गांवर तैनात करण्यात येत आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही रॉंग साईड वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर नजर ठेवली जाणार आहे. अल्पवयीन मुलांना वाहने देणाऱ्या पालकांनाही आता जबाबदार धरले जाणार आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे वाहन देण्यापूर्वी त्याचे वय, वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहतूक नियमांचे पालन याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा वाहनचालकासोबत पालकांवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते.
---------------
सोनेगाव वाहतूक पोलिसांची कारवाई
या अभियानाच्या सुरुवातीलाच सोनेगाव वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत पांडे यांनी कारवाईस सुरुवात केली आहे. रॉंग साईडने वाहन चालविणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले. त्याच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास दिल्याप्रकरणी त्याच्या वडिलांविरुद्धही बजाजनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देणाऱ्या पालकांना चांगलाच धडा मिळणार आहे.
पालकांनी काळजी घ्यावी
- अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देऊ नका.
- रॉंग साईडने वाहन चालविणे टाळा.
- सिग्नल आणि वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करा.
- दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करा.
- नियमभंग केल्यास दंडासोबत गंभीर प्रकरणांत गुन्हाही दाखल होऊ शकतो.