बनावट नंबर प्लेट, ई-चलान मॅसेज आणि १० चोरीच्या ऑटो रिक्षांचा पर्दाफाश

वाशीम स्थागुशा पथकाची धडक कारवाई

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
वाशीम,
e challan एका चुकून आलेल्या ई-चलान मेसेजने ऑटो चोरी रॅकेटचा पर्दाफाश होवून राज्यातून आणि परराज्यातून चोरीला गेलेल्या ऑटो रिक्षांचा बिनदिक्कत व्यापार करणार्‍या एका गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात वाशीमच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, एकूण ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
 
e challan
 
 
याबाबत सविस्तर असे की, हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर अचानक वाशीम आणि मालेगाव परिसरात झालेला ई-चलानचा मेसेज आला. विशेष म्हणजे, आपली रिक्षा तर स्वतःजवळ असतांना वाशीममध्ये आपल्या ऑटो नंबरवर दंड कसा काय कापला गेला? या शंकेने मूळ मालक चक्रावला. त्याने ही बाब तात्काळ वाशीम मधील पोलिस अंमलदार विठ्ठल महाले यांच्या कानावर घातली. महाले यांनी लगेच त्या ऑटोचा फोटो मागवून घेतला. तपास केला असता एक धक्कादायक बाब समोर आली. रिक्षा भलतीच होती, पण नंबरप्लेट मात्र हिंगोलीच्या त्या मूळ मालकाची वापरली जात होती. याच दरम्यान वाशीम तालुयातील एका दुसर्‍या इसमाच्या मोबाईलवरही असाच ई-चलानचा मेसेज आला. त्यालाही फोटो दाखवला असता त्याने स्पष्ट सांगितले, हा ऑटो माझा नाही, पण यावर असलेला नंबर माझ्या जुन्या ऑटोचा आहे.
पोलिसांनी याबाबत गुप्त तपास केला असता वाशीम शहरातील शुक्रवारी पेठ, इनामदारपुरा येथील रहिवासी दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याच्याकडे ऑटो असल्याचे समोर आले. पथकाने घुगे याच्या घरावर छापा टाकला असता तब्बल १० ते १२ ऑटो रिक्षा उभ्या असलेल्या पाहून पोलिस चक्रावले.पोलिसी खाया दाखवताच आरोपीने ऑटो चोरीचे असल्याचे सांगीतले.e challan पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ८ लाख ६० हजार रुपये किमतीच्या १० चोरीच्या ऑटो रिक्षा जप्त केल्या असून, आरोपी दादाराव घुगे याला ताब्यात घेतले आहे.
पोलिस स्टेशन वाशीम शहर येथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, पोलिस विभागीय अधिकारी रामकृष्ण पवार, पोलिस निरीक्षक सुधाकर आढे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोहेकॉ गजानन अवगळे, दिलीप देवकते, विनोद अवगळे, पोलिस अंमलदार विठ्ठल महाले, संदीप दुतोंडे, तुषार ठाकरे आणि चालक सुनील तायडे यांच्या पथकाने केली.