गोसेखुर्दचे २३ दरवाजे उघडले

हवामान विभागाचा विदर्भाला यलो अलर्ट

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |

 

नागपूर
gosekhurdनागपूरसह विदर्भात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. गोसेखुर्द धरणाचे २३ दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. हवामान विभागाने पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला असून, पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
 
gosekhurd

विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्यात आज दिवसभर ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज पाहून नियोजन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

विसर्ग वाढला.

 
नागपूर विभागासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुजारीटोला आणि धापेवाडा धरणांतून वैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने विसर्ग वाढविला आहे. दुपारपर्यंत १९ दरवाजे अर्धा मीटर उघडून ८१ हजार ५०६ क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात होते. सायंकाळी आणखी ४ दरवाजे उघडण्यात आले असून सध्या २३ दरवाजांतून ९६ हजार ४१७ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. वैनगंगा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.