लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! जुलै महिन्यासाठी शासनाकडून ३४४.७४ कोटींचा निधी वितरीत ladaki bahin

अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र भगिनींच्या खात्यात लवकरच जमा होणार रक्कम

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |

 

तभा वृत्तसेवा
मुंबई

ladaki bahin महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे जुलै २०२६ चा आर्थिक लाभ देण्यासाठी ३४४ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत २४ ऑगस्ट २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

 
ladki bahin 1
 

सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती विशेष घटक कार्यक्रमांतर्गत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेकरिता एकूण ३००० कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी जुलै महिन्याचा हप्ता पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ३४४.७४ कोटी रुपयांचा हा निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांकडे अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर वर्ग करण्यात आला आहे.

 

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची योग्य ती छाननी करून केवळ पात्र अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील महिलांनाच हा लाभ दिला जाईल, याची संपूर्ण जबाबदारी महिला व बाल विकास विभागाची राहणार आहे. तसेच उपलब्ध करून दिलेल्या या निधीचा काटेकोरपणे आणि काटकसरीने विनियोग करून त्याचा मासिक खर्चाचा अहवाल व निधी उपयोगिता प्रमाणपत्र दरमहा १० तारखेपर्यंत सादर करणे संबंधित विभागाला बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्य शासनाकडून निधीचे वितरण झाल्यामुळे आता पात्र भगिनींच्या थेट बँक खात्यात जुलै महिन्याची लाभाची रक्कम लवकरच जमा होणार असून लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.