तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
raver massacre case जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील चार अल्पवयीन बालकांच्या सामूहिक हत्याकांडाचा अत्यंत गुंतागुंतीचा तपास करून आरोपीला न्यायालयाकडून फाशीची शिक्षा होईल, अशी ऐतिहासिक दोषसिद्धी घडवून आणल्याबद्दल पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांचा पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते उत्कृष्ट दोषसिद्धी प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
ऑगस्ट 2020 मध्ये रावेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेतातील घरात चार अल्पवयीन मुलांची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. मृतांमध्ये 13 वर्षांची मुलगी, 11 वर्षांचा मुलगा, 8 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांची मुलगी यांचा समावेश होता.
तपासादरम्यान 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचेही निष्पन्न झाले. घटनास्थळ एकांतात असल्याने सुरुवातीला आरोपीबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नव्हता. त्यामुळे गुन्ह्याचा छडा लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
तत्कालीन परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी पारंपरिक तपास पद्धतीसोबत तांत्रिक तपास, परिस्थितीजन्य पुरावे आणि ‘लास्ट सीन थिअरी’चा वापर करून महेंद्र बरेला याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न केला.
हे प्रकरण भुसावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालय तथा विशेष न्यायालयात चालले. न्यायालयाने चार निष्पाप बालकांच्या सामूहिक हत्याकांडाला अत्यंत क्रूर स्वरूपाचा गुन्हा मानत ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ श्रेेणीत टाकले.
न्यायालयाने 4 जून 2026 रोजी आरोपी महेंद्र सीताराम बरेला याला भादंवि कलम 302 अंतर्गत फाशीची शिक्षा, तसेच पोक्सो व अत्याचाराच्या कलमांखाली आमरण जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
प्रत्यक्षदर्शी पुरावे नसतानाही वैज्ञानिक तपास, परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक तपास आणि पुराव्यांची शास्त्रोक्त सांगड घालून दोषसिद्धी करण्यात तपास पथकाला यश आले.raver massacre case या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते कुमार चिंता यांचा गौरव करण्यात आला.