तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
illegal activities यवतमाळ शहरासह जिल्ह्यात मटका, जुगार, भिंगरी, यासह अवैध दारूविक्रीसारख्या अवैध व्यवसायांनी पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी हे व्यवसाय खुलेआम सुरू असल्याने पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात विशेष पथके कार्यरत असतानाही परिस्थितीत अपेक्षित फरक दिसत नाही. त्यामुळे हे विशेष पथके शोभेची वस्तू बनली आहे.
यवतमाळ, उमरखेड, कळंब, पांढरकवडा यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांत मटका, जुगार आणि भिंगरी जोरात सुरू असल्याची चर्चा आहे. यवतमाळातही या अवैध व्यवसायांना ऊत आल्याचे दिसून येत आहे. यावर पोलिसांकडून पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होत नाही. या अवैध धंद्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
बीयर शॉपीतच ‘पिण्याची’ सोय..?
शासनाच्या नियमानुसार बीयर शॉपीत बंद बाटली विक्रीची परवानगी आहे.illegal activities मात्र शहरातील काही बीयर शॉपीमध्ये त्याच ठिकाणी बीयर पिण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे नियमांचे उल्लंंघन होत आहे. यावर देखील कोणतीच कारवाई करण्यात येत नाही.
पुढाऱ्यांनी मिटले डोळे
अवैध धंद्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. मात्र, याकडे राजकीय पुढाऱ्यांनी डोळे मिटल्याने यावर कठोर कारवाई होत नाही.