नवी दिल्ली,
India ranks fourth in military power जगातील लष्करी शक्तींच्या २०२६च्या क्रमवारीत भारताने दमदार स्थान मिळवले आहे. ग्लोबल फायरपॉवरच्या १४५ देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर असून पाकिस्तान १४व्या स्थानी आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या क्रमवारीत तब्बल १० स्थानांचे अंतर आहे. या यादीत अमेरिका पहिल्या, रशिया दुसऱ्या आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ग्लोबल फायरपॉवरकडून देशांच्या लष्करी क्षमतेचे मूल्यांकन करताना ६०हून अधिक निकषांचा विचार केला जातो. यामध्ये सैन्यबळ, रणगाडे, लढाऊ विमाने, युद्धनौका, संरक्षणासाठी उपलब्ध आर्थिक संसाधने, लॉजिस्टिक्स, नैसर्गिक संसाधने आणि भौगोलिक स्थिती यांचा समावेश आहे. या आधारावर प्रत्येक देशाला पॉवर इंडेक्स स्कोअर दिला जातो. या स्कोअरचे मूल्य जितके कमी, तितकी संबंधित देशाची लष्करी ताकद अधिक मानली जाते.
२०२६च्या क्रमवारीत अमेरिकेचा पॉवर इंडेक्स ०.०७४१ असून तिने अव्वल स्थान कायम राखले आहे. रशियाचा स्कोअर ०.०७९१ तर चीनचा ०.०९१९ आहे. भारताचा पॉवर इंडेक्स ०.१३४६ असून तो चौथ्या क्रमांकावर आहे.भारतीय लष्कराच्या क्षमतेबाबत ग्लोबल फायरपॉवरच्या आकडेवारीनुसार, भारताकडे अंदाजे ४९,५८,००० एकूण लष्करी कर्मचारी आहेत. देशाच्या ताफ्यात एकूण २,१८३ विमाने असून त्यापैकी ४७६ लढाऊ विमाने आणि ५९४ हेलिकॉप्टर आहेत. भारताकडे अंदाजे ३,९१३ रणगाडे असून मोठ्या प्रमाणात चिलखती वाहने, युद्धनौका आणि क्षेपणास्त्र प्रणालीही आहेत.
पाकिस्तानचा पॉवर इंडेक्स ०.२६२६ असून तो १४व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानकडे १,३९७ विमाने असून त्यापैकी ३३१ लढाऊ विमाने आहेत. रणगाड्यांच्या बाबतीतही भारत पाकिस्तानपेक्षा पुढे आहे. भारताकडे सुमारे ३,९१३ रणगाडे आहेत, तर पाकिस्तानकडे अंदाजे २,६७७ रणगाडे आहेत. भारताच्या पुढे केवळ अमेरिका, रशिया आणि चीन हे तीन देश आहेत. भारतानंतर दक्षिण कोरिया, फ्रान्स, जपान, यूके, तुर्की आणि इटली यांचा क्रमांक लागतो. या क्रमवारीत अण्वस्त्रांची प्रत्यक्ष युद्धक्षमता थेट मोजली जात नसल्याचेही ग्लोबल फायरपॉवरच्या मूल्यांकनात नमूद करण्यात आले आहे.