तेहरान,
Iran's warning to Trump अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसत असून, इराणने अमेरिकेच्या आर्थिक कारवाईला पाठिंबा देणाऱ्या देशांना थेट इशारा दिला आहे. अशा देशांची कृती ‘युद्ध’ मानली जाईल आणि त्याला बळाचा वापर करून प्रत्युत्तर दिले जाईल, असे इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे नवनियुक्त प्रमुख मोहसेन रझाई यांनी स्पष्ट केले.रझाई यांनी रविवारी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून इशारा देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभाव्य कारवाईवरही प्रतिक्रिया दिली. सरकारी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, ट्रम्प यांनी काही पाऊल उचलल्यास इराणकडून बळाचा वापर करून उत्तर दिले जाईल, असे म्हटले.

दरम्यान, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझंट सोमवारी इराणविरोधात नवीन निर्बंध जाहीर करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मध्यस्थांच्या माध्यमातून अमेरिका-इराण चर्चा पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांना वेग देण्यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख सोमवारी इराणला भेट देण्याची शक्यता आहे. इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीने परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी फील्ड मार्शल आसिम मुनीर सोमवारी तेहरानमध्ये पोहोचणार असून ते एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी अमेरिका आणि इराणमधील शाब्दिक संघर्ष कायम आहे. इराणच्या नव्याने स्थापन झालेल्या प्राधिकरणाने काही जहाजांची यादीही जाहीर केली असून, भविष्यात या मार्गावरून प्रवास केल्यास त्यांना निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी जूनच्या मध्यात झालेल्या सामंजस्य कराराचे समर्थन केले आहे. ‘युद्ध नाही आणि शांतताही नाही’ अशा कोंडीतून बाहेर पडण्यासाठी हा करार सर्वोत्तम पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. युद्ध सुरू होऊन जवळपास सहा महिने उलटले असूनही तेहरानला परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात यश आलेले नाही, असेही त्यांनी नमूद केले. आपल्या भाषणात पेझेश्कियन यांनी या करारामध्ये शरणागती मानावी अशी कोणतीही तरतूद नसल्याचे स्पष्ट केले. देशाचे सर्वोच्च नेते धोरणे ठरवतात आणि त्यांच्या निर्देशानुसार पुढील निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले. त्यांचे हे भाषण इराणच्या सरकारी वृत्तसंस्था IRNA ने प्रसिद्ध केले आहे. या वृत्ताला एपीकडून मिळालेल्या माहितीची जोड आहे.