विद्यार्थ्यांच्या बससेवेचा प्रश्न पेटला : अभाविपचा आंदोलनाचा इशारा

-वणी आगाराला तीन दिवसांची मुदत -मागणी मान्य न झाल्यास चौथ्या दिवशी तीव्र आंदोलन

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी,
abvp threatens protest तालुक्यातील विविध गावांमधून वणी शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना बससेवेच्या अनियमिततेचा मोठा फटका बसत आहे. वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने शाळा व महाविद्यालयातील तासिकांना उशीर होत आहे. परतीच्या प्रवासासाठीही योग्य वेळेची बस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना वणी शहरात तासंतास थांबावे लागत आहे. या पृष्ठभूमिवर बससेवा सुरळीत व नियमित करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वणी नगरच्या वतीने वणी बसस्थानक आगार प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
 

abvp threatens protest 
 
बाहेरगावाहून शिक्षणासाठी वणी येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, बसच्या अनियमित फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळेचे मोठे नुकसान होत आहे. ही समस्या केवळ एका गावापुरती मर्यादित नसून परिसरातील अनेक गावांतील विद्यार्थी या समस्येला सामोरे जात असल्याचे अभाविपने निवेदनातून स्पष्ट केले. निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते वणी आगारात पोहोचले असता आगार व्यवस्थापक यवतमाळ येथे गेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या बससेवेच्या समस्येबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. समस्या तातडीने मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
त्यानंतर आगारात उपस्थित असलेल्या लिपिकांकडे अधिकृत निवेदन सुपूर्द करण्यात आले. बससेवा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाला तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.abvp threatens protest या कालावधीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांची ठोस अंमलबजावणी झाली नाही व बससेवा कायमस्वरूपी सुरळीत राहण्यासाठी ठोस कार्यवाही व त्याबाबतचे आश्वासन देण्यात आले नाही, तर चौथ्या दिवशी वणी बसस्थानक येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अभाविपने दिला. यावेळी नयन क्षिरसागर, अंकित भालेराव, शितेश गोवारकरसह कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने त्रस्त विद्यार्थी उपस्थित होते.