कुरखेडा,
kurkheda sub-district hospital तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी राज्याच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची मंत्रालयात भेट घेऊन विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. यावेळी रुग्ण, महिला तसेच सामाजिक योजनांसह विविध समस्यांबाबत निवेदने सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी प्रमुख मागणी चांगदेव फाये यांनी केली. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांसाठी हे रुग्णालय आरोग्यसेवेचे महत्त्वाचे केंद्र असून, मनुष्यबळाअभावी रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्यास प्राधान्य देऊन नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच कुरखेडा येथे ट्रॉमा केअर युनिट सुरू करण्यात यावे, जेणेकरून अपघातग्रस्त व गंभीर रुग्णांना तातडीची वैद्यकीय सुविधा मिळण्यास मदत होइल. त्यामुळे या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली. याशिवाय बाल संगोपन योजनेच्या लाभार्थींचे प्रलंबित मानधन त्वरित वितरित करावे आणि पुढील काळात मानधन नियमितपणे देण्यात यावे, मानधन रखडल्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची बंद असलेली ई-केवायसी प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.